पंतप्रधान मोदींच्या बेंगळुरू दौऱ्यापूर्वी सापडल्या जिलेटीन कांड्या

सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
just now
पंतप्रधान मोदींच्या बेंगळुरू दौऱ्यापूर्वी सापडल्या जिलेटीन कांड्या

बेंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेंगळुरू दौऱ्यापूर्वी शहरात स्फोटके सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शहराच्या बाहेरील भागात असलेल्या एका पुलाखाली जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने सुरक्षा यंत्रणांची एकच धावपळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कग्गलीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताटागुणी भागातील आगारा तलावाजवळ ही स्फोटके हस्तगत करण्यात आली. हा भाग पंतप्रधानांच्या नियोजित दौऱ्याच्या मार्गाजवळच असल्याने सुरक्षा यंत्रणांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने (BDDS) घटनास्थळी धाव घेत तपासणी केली असता तेथे जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या. यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याची चर्चा परिसरात आहे.

gelatin sticks found near pm modi’s convoy route in bengaluru, police launch probe

या खळबळजनक प्रकारानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत बेंगळुरूच्या कोरामंगला भागातील एका घरातून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीला अज्ञात स्थळी नेण्यात आले असून, तिथे वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याची चौकशी करत आहेत. ही स्फोटके तेथे कशासाठी ठेवली होती आणि यामागे काही घातपाताचा कट होता का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बेंगळुरू शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दौऱ्याचा मार्ग आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून फॉरेन्सिक तज्ज्ञही या स्फोटकांचा अधिक तपास करत आहेत. प्राथमिक तपासात या स्फोटकांचा स्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.


हेही वाचा