
चेन्नई : तमिळनाडूमधील सत्तास्थापनेच्या राजकीय घडामोडींना निर्णायक वळण मिळाले आहे. विदुथलाई चिरुथैगल कच्चीने (VCK, व्हीसीके) अखेर सी. जोसेफ विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघमला (TVK) पाठिंबा जाहीर केला आहे. व्हीसीकेने आज शनिवारी चेन्नई येथे टीव्हीके नेते आधारव अर्जुना यांच्याकडे अधिकृत पाठिंबा पत्र सुपूर्द केले.
व्हीसीकेच्या निर्णयामुळे विजय यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, व्हीसीकेचे दोन आमदार टीव्हीके आघाडीच्या बाजूने उभे राहणार आहेत. यानंतर टीव्हीके नेते आधारव अर्जुना यांनी “विजय हे तमिळनाडूचे पुढील मुख्यमंत्री असतील,” असा दावा केला.
राजकारण रंगण्याची शक्यता
दरम्यान, राज्यात सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचाली वेगाने सुरू असतानाच राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे शनिवारी सायंकाळी चेन्नईहून तिरुवनंतपुरमकडे रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुढील काही तासांत राज्यातील राजकारण आणखी रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टीव्हीके आघाडीचे संख्याबळ खालीलप्रमाणे आहे.
व्हिसिकेच्या पाठिंब्यानंतर विजय यांच्या आघाडीचे संख्याबळ बहुमताच्या पुढे गेले आहे.
टीव्हीके : १०८ जागा (प्रभावी संख्या १०७)
काँग्रेस : ५ जागा
सीपीआय : २ जागा
सीपीआय (एम) : २ जागा
व्हीसीके : २ जागा
यामुळे टीव्हीके आघाडीची एकूण संख्या ११९ वर पोहोचली असून; सरकार स्थापनेसाठी आवश्यक बहुमताचा आकडा त्यांनी पार केला आहे.