सुब्रमणी यांनी जम्मू-काश्मीर आणि ईशान्येतील महत्त्वाच्या ऑपरेशनल क्षेत्रांमध्ये कमांड सांभाळली आहे

नवी दिल्ली : भारतीय सैन्यदलाच्या संरचनेत केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाचे बदल केले असून, लेफ्टिनेंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी यांची देशाचे नवे 'चीफ ऑफ डिफेंस स्टाफ' (CDS) म्हणून नियुक्ती केली आहे. वर्तमान सीडीएस जनरल अनिल चौहान ३० मे २०२६ रोजी आपला कार्यकाळ पूर्ण करून निवृत्त होत आहेत. त्यानंतर सुब्रमणि हे पदभार स्वीकारतील. सुब्रमणि यांच्याकडे तिन्ही सेनादलांमधील समन्वय साधण्याची आणि लष्करी व्यवहार विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी असेल.
)
प्रदीर्घ अनुभव आणि कर्तृत्व
लेफ्टिनेंट जनरल सुब्रमणि यांचा सैन्य दलातील प्रवास सुमारे ४० वर्षांचा आहे. त्यांनी भारतीय लष्कराच्या उपप्रमुख पदासह सेंट्रल कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून यशस्वी काम पाहिले आहे. जम्मू-काश्मीर, आसाम आणि देशाच्या पश्चिम सीमांसारख्या संवेदनशील भागांत त्यांनी लष्करी कारवायांचे नेतृत्व केले आहे. ८ गढवाल रायफल्समधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुब्रमणी यांनी लष्कराच्या स्ट्राइक कोरचेही नेतृत्व केले आहे. त्यांच्या या अतुलनीय सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदक (PVSM), अति विशिष्ट सेवा पदक (AVSM) यांसह अनेक लष्करी सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.

लष्करी आधुनिकीकरण आणि समन्वय
सीडीएस पदाची निर्मिती ही प्रामुख्याने तिन्ही दलांमध्ये (भूदल, नौदल आणि वायुदल) समन्वय वाढवण्यासाठी आणि युद्धाच्या काळात 'सिंगल पॉइंट मिलिटरी ॲडव्हाइजर' म्हणून काम करण्यासाठी करण्यात आली आहे. सुब्रमणी हे सध्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून काम करत असल्याने, त्यांना धोरणात्मक नियोजनाचा मोठा अनुभव आहे. आधुनिकीकरणाच्या काळात भारतीय लष्कराला अधिक सक्षम बनवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

नौदल प्रमुखपदी वाइस एडमिरल स्वामीनाथन
सीडीएस नियुक्तीसोबतच केंद्र सरकारने वाइस एडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची नौदलाचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या ते पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख म्हणून मुंबईत कार्यरत आहेत. ३१ मे रोजी ते आपला पदभार स्वीकारतील आणि त्यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२८ पर्यंत असेल. स्वामीनाथन हे 'कम्युनिकेशन' आणि 'इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर' मधील तज्ज्ञ मानले जातात. त्यांनी ब्रिटन आणि अमेरिकेतील नामांकित लष्करी महाविद्यालयांतून उच्च शिक्षण घेतले असून, त्यांच्याकडे समुद्रातील सुरक्षा आव्हानांना तोंड देण्याचा व्यापक अनुभव आहे.

या दोन्ही महत्त्वाच्या नियुक्त्यांमुळे भारतीय लष्कराच्या वरिष्ठ नेतृत्वात नवीन ऊर्जेचा संचार झाला आहे. जागतिक स्तरावर बदलती भू-राजकीय स्थिती पाहता, सुब्रमणी आणि स्वामीनाथन यांची ही पदे देशाच्या संरक्षणासाठी मैलाचा दगड ठरणार आहेत.