विधिमंडळ बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली नावाची घोषणा; उद्या होणार शपथविधी

कोलकाता : पश्चिम बंगालच्या (West Bengal) राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडली असून भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी सुवेंदू अधिकारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुवेंदू अधिकारी यांची नेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे पश्चिम बंगालला पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. उद्या ९ मे रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यापूर्वी भाजप नेतृत्वाने त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर केले.
उद्या ९ मे रोजी शनिवारी सकाळी १० वाजता कोलकाता येथील ‘ब्रिगेड परेड ग्राउंड’वरील सोहळ्यात सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
भवानीपूर मतदारसंघाचे आमदार असलेले सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) हे २०२१ ते २०२६ दरम्यान पश्चिम बंगाल विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत होते. एकेकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीयांपैकी असलेल्या अधिकारी यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश करून तृणमूल काँग्रेसविरुद्ध आक्रमक भूमीका घेतली.
२०२१ मध्ये नंदीग्राम आणि २०२६ मध्ये भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा पराभव करत सुवेंदू अधिकारी यांनी राज्यातील प्रमुख विरोधी चेहरा म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. भाजपच्या प्रचंड विजयाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नेतृत्वाखाली आता पश्चिम बंगालमध्ये नव्या राजकीय पर्वाची सुरूवात होणार असल्याचे मानले जात आहे.