ऑपरेशन क्रॅकडाऊन : नांदेडमध्ये तब्बल ५ हजार बेकायदेशीर शस्त्रांचा साठा जप्त

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
6 hours ago
ऑपरेशन क्रॅकडाऊन : नांदेडमध्ये तब्बल ५ हजार बेकायदेशीर शस्त्रांचा साठा जप्त

नांदेड : महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासातील एका सर्वात मोठ्या कारवाईत, नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री मोठी शस्त्र तस्करी उघडकीस आणली आहे. ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत राबवण्यात आलेल्या या मोहिमेत पोलिसांनी सुमारे ५ हजार धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. यामध्ये तलवारी, गुप्त्या आणि खंजीर यांसारख्या घातक शस्त्रांचा समावेश असून, बाजारभावानुसार याची किंमत ४३.४८ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी मोहीम राबवण्यात आली. बुधवारी रात्री ११ च्या सुमारास निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाला बळीरामपूर परिसरात अभिजीत गिरधर सातपुते नावाचा तरुण संशयास्पद रित्या फिरताना आढळला. त्याच्याकडे शोध घेतली असता कमरेला लपवलेली तलवार आणि खंजीर सापडले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने वझीराबाद परिसरातील गुरु रामदास नगर येथील एका गोदामाची माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गुरु रामदास नगरमधील गोदामावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना पाहून एक संशयित अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. मात्र, गोदामाची झडती घेतली असता पोलीसही अवाक झाले. तिथे ३१५ मोठ्या तलवारी, १३५ मध्यम तलवारी, शेकडो गुप्त्या, खंजीर आणि फोल्डिंग चाकूंचा साठा साठवून ठेवलेला होता. ही कारवाई तब्बल २४ तास सुरू होती.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले की, जप्त केलेल्या शस्त्रांपैकी ९० टक्के शस्त्रे ही गुन्हेगारी कृत्यांसाठी वापरण्याजोगी आहेत. केवळ १० टक्के शस्त्रे धार्मिक किंवा शोभेच्या कारणांसाठी असावीत असा अंदाज आहे. ही सर्व शस्त्रे 'इंपोर्ट क्वालिटी'ची असून ती केवळ जिल्ह्यातच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरही पुरवली जाणार होती का, याचा तपास पोलीस करत आहेत.

या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार जसवंतसिंग प्रकाशसिंग सुखमणी हा असल्याचे निष्पन्न झाले असून तो सध्या फरार आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४ आणि २५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात संघटित गुन्हेगारीची कलमे लावण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे.

शहरात सजावटीच्या किंवा भेटवस्तूंच्या नावाखाली चालणाऱ्या बेकायदेशीर शस्त्र विक्रीवर आता कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमुळे राज्यातील शस्त्र तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा