महुआ मोइत्रांची विमानात छेड; नागरी उड्डाणमंत्र्यांकडे तक्रार

'इंडि' आघाडीच्या प्रमुख नेत्यांना टॅग करत मोइत्रांनी उपस्थित केले महिला सुरक्षेवर प्रश्न.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
महुआ मोइत्रांची विमानात छेड; नागरी उड्डाणमंत्र्यांकडे तक्रार

कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ खासदार महुआ मोइत्रा यांनी हवाई प्रवासात इंडिगो विमानात त्यांच्यासोबत गैरवर्तन आणि छेडछाड झाल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. गुरुवारी कोलकात्याहून दिल्लीला जात असताना हा प्रकार घडल्याचे त्यांनी समाजमाध्यमावर पोस्ट शेअर करत जाहीर केले. महुआ मोइत्रा या संरक्षण विषयावरील संसदीय स्थायी समितीच्या बैठकीसाठी दिल्लीला जात होत्या. या प्रवासादरम्यान एका गटाने त्यांचे विनापरवानगी चित्रीकरण केले आणि त्यांची छेड काढली, असा आरोप त्यांनी केला आहे. 



महुआ मोइत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या 'इंडिगो ६ई ७१९' या विमानाने प्रवास करत होत्या. लॅंडींग झाल्यानंतर विमानाचे दरवाजे उघडण्यापूर्वीच ४ ते ६ जणांच्या एका गटाने त्यांचे मोबाईलद्वारे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. केवळ चित्रीकरणच नाही, तर या प्रवाशांनी त्यांच्याकडे बघून अश्लील हावभाव केले आणि त्यांची छेड काढली, असा दावा मोइत्रा यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू किंजरापू आणि इंडिगो एअरलाईन्सला टॅग करत संबंधित प्रवाशांना 'नो-फ्लाय' लिस्टमध्ये टाकण्याची मागणी केली आहे.


Crowd Inside a Flight Calls Mahua Moitra a Thief to Her Face, Video Goes  Viral | Republic World


पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर ही घटना घडली आहे. मात्र, महुआ मोइत्रा यांनी ही कोणतीही 'राजकीय प्रतिक्रिया' किंवा 'जनतेचा राग' नसल्याचे स्पष्ट केले आहे. ही सरळसरळ महिलेची  छेडछाड आणि सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन आहे, असे त्या म्हणाल्या. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये ममता बॅनर्जी, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांसारख्या 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनाही टॅग केले आहे.


Mahua Moitra says was harassed aboard flight, faced 'Jai Shri Ram, TMC  chor' chants


दुसरीकडे, इंडिगो एअरलाईन्सने या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती किंवा प्रवाशांची नावे जाहीर केलेली नाहीत. सामान्यतः अशा प्रकरणांमध्ये विमान कंपनी अंतर्गत तपास करते आणि त्यानंतरच नागरी उड्डाण महासंचालनालयाकडे (DGCA) अहवाल सोपवला जातो. गेल्या काही काळात भारतीय विमान वाहतुकीत प्रवाशांच्या गैरवर्तनाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. महुआ मोइत्रा यांनी या घटनेचा निषेध करत विमान कर्मचाऱ्यांनी (Cabin Crew) यासंदर्भात त्वरित अहवाल द्यावा आणि दोषी प्रवाशांची नावे जाहीर करून त्यांना शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीनंतरच सत्य समोर येईल, मात्र तोपर्यंत विमान प्रवासातील शिस्त आणि सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा