परस्परविरोधी गुन्हे दाखल; एकाची प्रकृती गंभीर

पणजी : म्हापसा येथील एकतानगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान मुलांच्या खेळावरून सुरू झालेल्या एका किरकोळ वादाचे रुपांतर गुरुवारी रात्री दोन शेजारी कुटुंबांमधील भीषण संघर्षात झाले. या हाणामारीत एका व्यक्तीवर काठ्या आणि घरातील फुलाच्या कुंडीने जीवघेणा हल्ला करण्यात आला असून, तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून म्हापसा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी मैदानात मुले खेळत असताना त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. हा वाद केवळ मुलांपुरता मर्यादित राहिला नाही. सकाळी मुलांच्या भांडणात दोन्ही घरातील महिलांनी उडी घेतली आणि त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. नंतर वातावरण काहीसे शांत झाले असले, तरी दोन्ही कुटुंबांमधील धुसफूस कायम होती. याच वादाचा वचपा काढण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी दोन्ही कुटुंबातील पुरुष सदस्य आमनेसामने आले. शाब्दिक वादाचे रुपांतर काही वेळातच शारीरिक हल्ल्यात झाले.
या संघर्षात दोन शेजाऱ्यांनी मिळून एका व्यक्तीवर लाठ्या-काठ्या आणि फुलांच्या कुंडीने हल्ला चढवला. डोक्यावर मार लागल्याने संबंधित व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. जखमी व्यक्तीला तातडीने म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
या हाणामारीत दोन्ही बाजूचे काही लोक किरकोळ जखमी झाले आहेत. म्हापसा पोलीस ठाण्यात या संदर्भात दोन्ही कुटुंबांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी क्रॉस कंप्लेंट (परस्परविरोधी गुन्हे) नोंदवून तपास सुरू केला आहे. नेमके भांडण कोणत्या कारणावरून सुरू झालं आणि वादाला हिंसक वळण कसे लागले, याचा शोध पोलीस घेत आहेत. शेजाऱ्यांमधील किरकोळ वादातून रक्ताचा सडा पडल्याने सदर वस्तीत संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी परिसरात शांतता राखण्याचे आवाहन केले असून, दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.