नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा

वाळपई : सत्तरी तालुक्यातील (Sattari Taluka) नद्यांमध्ये बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने; प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली आहे. तालुक्यातील अनेक धोकादायक नदीपात्रांमध्ये (River) आंघोळ करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
मोर्ले ग्रामपंचायत (Morlem Gram Panchayat) क्षेत्रातील उभो गुणो तसेच इतर भागांमध्ये या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पंचायत प्रशासनाने दिला आहे. यासंदर्भातील सूचनाफलकही नदीकाठांवर लावण्यात आले आहेत.
सत्तरी तालुक्यातील विविध नदीपात्रांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बुडून मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः ज्यांना पोहता येत नाही अशी मंडळी उष्णतेपासून दिलासा मिळावा म्हणून नदीवर आंघोळीसाठी येत असतात. काही ठिकाणी दारूच्या नशेत धिंगाणा घातल्यानंतर नियंत्रण सुटून पाण्यात बुडण्याच्या घटना घडत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन
नदीपात्रात आंघोळ करण्यास मनाई असल्याचे वारंवार सांगूनही काही नागरिक नियमांचे उल्लंघन करून नदीत उतरत असल्याच्या तक्रारी पंचायतीकडे सातत्याने येत होत्या. त्यानंतर पंचायत प्रशासनाने उभो गुणो व इतर धोकादायक भागांमध्ये नदीत आंघोळ करण्यास पूर्णपणे बंदी जाहीर केली आहे. नागरिकांनी सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून नदीत उतरण्यास बंदी : सरपंच शिरोडकर
यासंदर्भात मोर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच अमित शिरोडकर यांनी सांगितले की, ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. उभो गुणो परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक आंघोळीसाठी येत असतात. मात्र हे नदीपात्र धोकादायक असून; यापूर्वीही अनेक दुर्दैवी घटना येथे घडल्या आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये; म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून पंचायत प्रशासनाने नदीत उतरण्यास बंदी घातली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी : उपजिल्हाधिकारी कुट्टीकर
दरम्यान, सत्तरीचे उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) लक्ष्मीकांत कुट्टीकर यांनी सांगितले की, आपत्कालीन व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करताना नदीत होणाऱ्या दुर्दैवी घटनांचा गांभीर्याने विचार करण्यात आला आहे. त्यानुसार पंचायतींना आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नदीपात्रात नागरिकांना प्रवेश देऊ नये व आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.