म्हापशातील फास्टफूड मालकासह चारजणांवर गुन्हा दाखल

म्हापसा : आंगड, म्हापसा येथील अलंकार थिएटर परिसरातील पापा फास्ट फूड सेंटरमध्ये (Fast food center) जेवणाच्या १६० रूपये बिलावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. फास्टफूड मालक आणि कर्मचार्यांच्या हल्ल्यात अन्साभाटमधील राजन हळदणकर (६० वर्षे) व राहुल हळदणकर (२९ वर्षे) हे पितापूत्र गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना गुरूवारी ७ रोजी मध्यरात्री १२.३०च्या सुमारास घडली. फिर्यादी राजन वामन हळदणकर (रा. अन्साभाट, म्हापसा) यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी फास्टफूडचे मालक आनंद हजारे, श्रीधर हजारे (रा. म्हापसा), रोहित रवी रॉय (रा. धुळेर व मूळ पश्चिम बंगाल) व एका अन्य अज्ञात कामगाराविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी राजन हळदणकर हे मुलगा राहुल समवेत अलंकार थिएटर परिसरातील पापा फास्टफूड सेंटरवर जेवायला गेले होते. जेवण झाल्यानंतर बिलाच्या रकमेवरून फास्टफूडचे मालक व कर्मचारी आणि त्यांचा किरकोळ वाद झाला. बीलाची रक्कम ही १६० रूपये होती.
यावेळी संशयित आरोपींनी दोघांनाही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे या वादाचे पर्यावसन हिंसक हाणामारीत झाले. फास्टफूड मधील स्वयंपाकासाठी वापरणार्या जड धातूच्या भांड्यांनी या बाप-लेकाला बेदम मारहाण केली.
या हल्ल्यात राहुल हळदणकर यांच्या डोक्याला खोलवर जखम झाली. त्यामुळे डोक्यावर आठ टाके पडले. तर राजन हळदणकर यांनाही शारीरिक दुखापत झाली आहे. सुरूवातीला म्हापसा पोलिसांनी (Mapusa Police) या हल्ला प्रकरणाला फिर्यादी व जखमीला जबाबदार धरत गुन्हा नोंदवण्यास चालढकल केली. मात्र नंतर सकाळी उशिरा भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२, ११८ (१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला व संशयितांना नोटीस जारी केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.