
म्हापसा :मरड, म्हापसा येथील कॉसमॉस सेंटर इमारतीमधील तीन कार्यालये चोरांनी फोडली. या कार्यालयांतील १५ हजार रुपये रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू लंपास करण्यात आल्या आहेत.
बुधवारी ६ रोजी ही चोरीची घटना उघडकीस आली, तर दुपारी म्हापसा पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. विकेश हसोटीकर आणि प्रवीण शेट यांच्या मालकीच्या कार्यालयांमध्ये ही चोरी झाली. यामध्ये हसोटीकर यांची दोन कार्यालये तर शेट यांच्या एका कार्यालयाचा समावेश आहे.
अज्ञात चोरांनी इमारतीच्या खिडकीची कडी आणि दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. सकाळी हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरांनी कार्यालयातील सामान विस्कळीत केले होते. हसोटीकर यांच्या कार्यालयातील १५ हजार रुपये रोख रक्कम तसेच तिन्ही कार्यालयांतील मौल्यवान वस्तूही चोरांनी पळवल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू आहे.