मुख्यमंत्री : १००० हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याचा अंदाज

बस्तोडा येथे म्हापसा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामाची होडीतून पाहणी करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर.
...
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : पावसाळ्यात गिरी व बस्तोडा येथील शेतजमीन अनेक वर्षे पावसाळ्यात पाण्याखाली जात होती. नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हा सुमारे एक हजार हेक्टर शेतीसाठी वरदान ठरणार आहे. म्हापसा नदीपात्रात सुमारे ४६ कोटी रुपये खर्चून हाती घेतलेले हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
मंगळवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी बस्तोडा येथे सुरू असलेल्या या कामाची जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्यासमवेत पाहणी केली. यावेळी साळगावचे आमदार केदार नाईक, जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता सालेलकर व स्थानिक सरपंच, पंच उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी होडीतून प्रवास करून कामाचा दर्जा पडताळून पाहिला. सुकूर, बस्तोडा येथून उगम पावणारा हा खाडीचा फाटा सुमारे ८ किलोमीटरचा प्रवास करून तार येथे म्हापसा नदीला मिळतो. नदीतील गाळ उपसणे, आवश्यकतेनुसार पात्राची रुंदी वाढवणे आणि मजबुतीसाठी संरक्षक बांध बांधणे, अशी कामे या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामार्फत राबवली आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर बस्तोडा, गिरी, सुकूर तसेच म्हापसा परिसरातील शेती ओलिताखाली येईल. यामुळे शेतकर्यांना वर्षातून दोन पिके घेणे शक्य होईल. यंदा पावसाळ्यात ही जमीन ओलिताखाली आणण्यासाठी शेतकर्यांना कृषी खात्याकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
उत्तम पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणार
नदी पुनरुज्जीवन प्रकल्प केवळ शेतीसाठीच नव्हे, तर हा परिसर निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी आणि फेरफटका मारण्यासाठी उत्तम पर्यटन स्थळ म्हणूनही विकसित केला जाईल. नागरिकांनी नदी पात्रात कचरा टाकणे बंद करावे आणि नदीचे पावित्र्य राखावे, असे आवाहनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
मागील दोन वर्षांत राज्यात सुमारे १०० बंधार्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. गिरी-बस्तोडा येथील प्रकल्पानंतर जमिनीची योग्य मशागत झाल्यास दरवर्षी सुमारे २० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल.
_ सुभाष शिरोडकर, जलस्रोतमंत्री