मैत्रीच्या बहाण्याने केला होता लैंगिक अत्याचार

पणजी : संशयित आणि पीडित मुलीच्या वयात मोठे अंतर आहे. तसेच संशयित विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. दरम्यान, प्रकरण सध्या प्राथमिक टप्प्यावर असून न्यायालयाने पीडित मुलीचा जबाब अद्याप नोंदवला नाही, असे निरीक्षण नोंदवून मेरशी येथील पाॅक्सो न्यायालयाने बार्देश तालुक्यातील १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ३४ वर्षीय संशयिताचा जामीन अर्ज फेटाळून लावला. याबाबतचा आदेश न्या. पूजा कवळेकर यांनी दिला.
या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी ३ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, १७ वर्षीय पीडित मुलीच्या नातेवाईकांनी फेब्रुवारी २०२६ मध्ये तक्रार दाखल केली. त्यात संशयिताने १ जुलै २०२५ ते ३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत युवतीशी मैत्रीच्या बहाण्याने संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिचा गैरफायदा घेऊन विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच संशयिताने पीडित मुलीचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये ठेवले आणि नंतर तिला लैंगिक सुखासाठी ब्लॅकमेल केल्याचे तक्रारीत म्हटले. याची दखल घेऊन पर्वरी पोलिसांनी संशयिताविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ७४, ३५१(२) आणि बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा (पाॅक्सो) कलम ४ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.
त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने संशयिताला प्रथम पोलीस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. याच दरम्यान पोलिसांनी तपास पूर्ण करून पाॅक्सो न्यायालयात संशयिताविरोधात आरोपपत्र दाखल केले. संशयिताने यानंतर न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून संशयिताचा जामीन अर्ज फेटाळून लावला.