ड्रग्ज तस्करी प्रकरणातील नायजेरियन नागरिकाला सशर्त जामीन

उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th May, 11:46 pm
ड्रग्ज तस्करी प्रकरणातील नायजेरियन नागरिकाला सशर्त जामीन

पणजी : पिळर्ण-बार्देश परिसरात कोकेनसह अटक करण्यात आलेल्या ओमेरिगो फ्रायडे (४२) या नायजेरियन नागरिकाला मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचे प्रमाण परिवर्तनीय असल्याचे निरीक्षण नोंदवून अतिरिक्त सत्र न्यायाधीश शिल्पा पंडित यांनी १ लाख रुपये आणि इतर अटींवर हा आदेश दिला.
गुन्हा शाखेला ६ फेब्रुवारी रोजी पिळर्ण येथे एक नायजेरियन नागरिक ड्रग्ज तस्करीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक महेश गडेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोवन पॅराडाइज कॉलनी परिसरात सापळा रचला. मध्यरात्री १.१० ते ४.१० च्या दरम्यान संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या ओमेरिगो फ्रायडेला पोलिसांनी ताब्यात घेतले.
तपास पूर्ण झाल्यानंतर गुन्हा शाखेने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर संशयिताने जामिनासाठी अर्ज केला होता. सुनावणीदरम्यान, आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला असून अटकेची माहिती नातेवाईकांना दिली गेली नाही, असा दावा संशयिताच्या वतीने करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि जप्त अमली पदार्थांच्या प्रमाणाचा विचार करून ओमेरिगो फ्रायडेला सशर्त जामीन मंजूर केला.
१५.८९ लाखांचे कोकेन जप्त
संशयिताची झडती घेतली असता, त्याच्याकडे १५.८९ लाख रुपये किमतीचा ३१.७९४ ग्रॅम कोकेन सापडला. पोलिसांनी ड्रग्जसह त्याने वापरलेली दुचाकीही जप्त केली आणि अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.