मेरशी येथील जलदगती न्यायालयाचा निवाडा

पणजी : बलात्काराच्या गुन्ह्यात सर्वात महत्त्वाची साक्षीदार म्हणजे पीडित. या प्रकरणात संशयिताने तिच्याशी लग्न केले आहे. त्यामुळे तिने त्याच्या विरोधात कोणताही आरोप नसल्याचे सांगितले. मात्र, या प्रकरणातील पीडित महिलेने जबाब फिरविला आहे, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने संशयिताची बलात्कार प्रकरणी निर्दोष सुटका केली. याबाबतचा आदेश मेरशी येथील जलदगती न्यायालयाच्या न्या. पूजा कवळेकर यांनी दिला.
या प्रकरणी हणजूण पोलिसांनी १८ आॅगस्ट २०२४ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, महिला आणि संशयित यांच्यात मैत्रीचे संबंध होते. संशयिताने तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर २ जून २०२४ रोजी ते दोघे गोव्यात आले होते. त्यावेळी ते दोघे नागोवा - बार्देश येथील एका गेस्ट हाऊसमध्ये राहिले. तिथे संशयिताने तक्रारदार महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. यानंतर संशयिताने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे पीडित महिलेने ३ आॅगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्रातील भांडूप पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार, तेथील पोलिसांनी गुन्हा दाखल करून हणजूण पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला.
हणजूण पोलिसांनी पीडित महिलेचा जबाब नोंद करून गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर हणजूण पोलिसांनी २ सप्टेंबर २०२४ रोजी संशयिताला अटक केली. पोलिसांनी ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पणजी येथील जलदगती न्यायालयात संशयिताविरोधात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर जलदगती न्यायालयाने १८ ऑक्टोबर २०२४ रोजी सशर्त जामीन मंजूर केला. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन ७ आॅगस्ट २०२५ रोजी आरोप निश्चित करून खटला सुरू केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, पीडित महिलेची न्यायालयात उलटतपासणी झाली. त्यात संशयिताने तिच्याशी लग्न केले आहे. तसेच तिने संशयिताविरोधात बलात्काराचा कोणताही आरोप नसल्याची साक्ष न्यायालयात दिली. याची दखल घेऊन न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून संशयिताची बलात्कार प्रकरणी पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली.