माकाझन येथील घटना : कारवार येथे नेत लुटले

मडगाव : माकाझन येथील बँकेबाहेरून अशोक कुमार याचे अपहरण करून, त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन ३ लाख लुटणार्या टोळीतील दोघाजणांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील संशयित बलराम बाबू कारीशेट्टी याने दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.
बोर्डा फातोर्डा येथील रहिवासी अशोक कुमार (५६ वर्षे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. २४ मार्च २०२६ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास माकाझन येथील कॅनरा बँकेबाहेरून नीलेश जाधव, बलराम बाबू कारीशेट्टी, अजित आणि इतर काही साथीदारांनी अशोक कुमार यांचे त्यांच्याच ह्युंदाई व्हेन्यू कारमधून अपहरण केले होते. त्यानंतर संशयितांनी तक्रारदाराला कर्नाटकातील कारवार येथील एका निर्जनस्थळी नेले. तिथे त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन आणि भीती दाखवून पैशांची मागणी केली. संशयितांनी अशोक कुमार यांच्या कारमध्ये असलेले ३ लाख रुपये जबरदस्तीने लुटून पळ काढला.
या प्रकरणात संशयित नीलेश भीमराव जाधव (वय ५३, रा. अकोला, महाराष्ट्र) याने अंमलबजावणी संचालनालयाचा अधिकारी असल्याचे भासवून अशोक कुमार याला लुटले होते. त्यालाही मायना कुडतरी पोलिसांनी दावणगिरी येथून बंगळुरूच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असतानाच अटक केली.
या प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी अजित कुमार कट्टीमणी (३४ वर्षे, रा. मडगाव) याला अटक केली होती. तो सध्या जामिनावर बाहेर आहे. या प्रकरणात आणखीही काही संशयित असण्याची शक्यता पोलीस तपासात वर्तवण्यात आली आहे. नीलेश जाधव हा ईडी अधिकारी म्हणून फसवणूक करत होता. त्याला संशयित बलराम कारीशेट्टी यानेच असे करावयाला सांगितलेले होते. ३ लाख लुटल्यानंतर दुसर्या वेळेला १.६० लाखांची वसुली नीलेश याने अशोक कुमार याच्याकडून केली होती. याशिवाय बलराम व नीलेश यांच्यातील कॉल्स रेकॉर्डवरुन दोघेही एकमेकांना ओळखत असून त्यांनीच हा कट रचल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या प्रकरणात बलराम कारीशेट्टी व त्याचे वडील बाबू कारीशेट्टी यांनी हा सर्व कट रचला असल्याची शक्यताही पोलीस तपासात व्यक्त होत आहे.
पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस कोठडीची गरज
संशयित बलराम कारीशेट्टी याच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेली गाडी, लुटलेले पैसे यासह इतर पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस कोठडीची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाकडून सर्व युक्तिवादानंतर संशयित बलराम कारीशेट्टी याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला.