चार संशयितांना अटक : मोबाईल, लॅपटॉपसह ३.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

मडगाव : कोलवा पोलिसांनी सलग दुसर्या दिवशी ऑनलाईन आयपीएल बेटींग व जुगारप्रकरणी कोलवा येथील बंगल्यावर छापा टाकत चार संशयितांना अटक केली. यात विशाल चावला (रा. हरयाणा), प्रफुल्ल ठाकर, धवल भाई व जय पटेल (सर्व रा. गुजरात) यांचा समावेश आहे. कारवाईत दोन लॅपटॉप, सहा मोबाईल व इतर जुगाराच्या साहित्यासह ३.१० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कोलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या ऑनलाईन जुगार अड्ड्याचा पोलिसांनी सलग दुसर्या दिवशी पर्दाफाश केला. वानेली कोलवा येथील एका बंगल्यात सुरू असलेल्या या बेकायदेशीर व्यवसायावर छापा टाकून चार जणांना अटक केली व जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले.
२५ एप्रिल रोजी रात्री गस्त घालत असताना पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भगत आणि त्यांच्या पथकाला वानेली येथील फ्लोरिडा गार्डनमधील एका बंगल्यात ऑनलाईन जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ सदर बंगल्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून दोन लॅपटॉप, ६ मोबाईल व इतर जुगाराशी संबंधित साहित्य असा ३.१० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी प्रफुल्ल ऊर्फ जिगर ठाकर (२८, रा. गुजरात), धवल दिनेश भाई (२४, रा. गुजरात), विशाल चावला (४५, रा. हरयाणा) व जय कमलेश पटेल (३१, रा. गुजरात) या चार संशयितांना अटक केली. अटकेनंतर पहाटे जामिनावर संशयितांची सुटका करण्यात आली.
यापूर्वी कोलवा पोलिसांनी बाणावली येथील एका फ्लॅटमध्ये केलेल्या कारवाईतही गुजरात येथील तिघा संशयितांना ऑनलाईन जुगार प्रकरणी अटक केली होती. कोलवा पोलिसांनी या प्रकरणी गोवा सार्वजनिक जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक संतोष देसाई आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवा पोलीस निरीक्षक विक्रम नाईक या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
ऑनलाईन बेटींगमध्ये गुजरातमधील संशयितांचा हात
कोलवा पोलिसांनी सलग दुसर्या दिवशी केलेल्या ऑनलाईन जुगारावरील कारवाईत चार संशयितांना अटक केली. यातील एक हरयाणातील तर तिघे गुजरातमधील आहेत. दोन दिवसांपूर्वी बाणावलीत केलेल्या कारवाईतही गुजरातमधील तिघांना अटक करण्यात आली होती. यामुळे ऑनलाईन बेटींग व जुगार प्रकरणात गुजरातमधील संशयितांना मोठा हात असल्याचे दिसून येत आहे.