
डिचोली : भाटवाडी-लाटंबार्से येथे ट्रान्सफॉर्मरच्या पायाभरणी कार्यक्रमादरम्यान मधमाशांच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गोंधळ उडाला. या घटनेत डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, जिल्हा पंचायत सदस्य आणि स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत.
शुक्रवारी आयोजित या कार्यक्रमासाठी आमदार डॉ. शेट्ये, जिल्हा पंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम सुरू असतानाच अचानक मधमाशांनी उपस्थितांवर हल्ला चढवला. त्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली.
या हल्ल्यात अनेकांना मधमाशांचे डंख बसले. आमदार डॉ. शेट्ये यांनाही डंख बसल्याची माहिती मिळाली आहे. जखमींपैकी ५ ते ६ जणांना तातडीने डिचोली आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, तर एक जण गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, स्थानिकांनी आणि उपस्थितांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना उपचारासाठी रवाना केले.