गौतम खट्टरच्या मुसक्या आवळण्यात गोवा पोलिसांना यश

हिमाचल प्रदेशमध्ये घेतले ताब्यात : आज आणणार गोव्यात


3 hours ago
गौतम खट्टरच्या मुसक्या आवळण्यात गोवा पोलिसांना यश

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : वास्को येथील सार्वजनिक कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गौतम खट्टर याला गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्या कारच्या माहितीवरून गुन्हा शाखेच्या पथकाने हिमाचल प्रदेश पोलिसाच्या मदतीने शुक्रवार, २४ एप्रिल रोजी सायंकाळी खट्टरच्या मुसक्या आवळल्या. शनिवार, २५ रोजी अटक करून त्याला ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणण्यात येणार आहे.
गौतम खट्टर याने वास्को येथे परशुराम जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सेंट झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. या प्रकरणी वास्को पोलीस उपनिरीक्षक डेव्हिड कॉस्ता यांनी खट्टरविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. कार्यक्रमानंतर गौतम खट्टर गोव्यातून त्याच्या मूळ गावी गेल्याचे समोर आले होते. वास्को पोलिसांचे पथक गौतम खट्टर याचा शोध घेण्यासाठी उत्तराखंडला रवाना करण्यात आले होते.
दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकरणाचा तपास गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी तपास सुरू करून कार्यक्रमाच्या आयोजकांचा जबाब नोंदवला होता. त्यावेळी आयोजकांनी गौतमचा भाऊ माधव खट्टरने कार्यक्रमाला गौतम येण्याबाबतची निश्चिती करून घेतली होती. माधवने गौतमच्या उपस्थितीसाठी आयोजकांकडून लॉजिस्टिक व्यवस्थेसाठी विमानाचे तिकीट, राहण्याची व्यवस्था आणि ५१ हजार रुपये घेतले होते. कार्यक्रमातील भाषण माधवनेच लिहून दिले होते. गौतमने ते वाचून दाखवले होते. त्यामुळे पोलिसांनी माधवला या प्रकरणात सहसंशयित केले. दरम्यान, वास्को पोलिसांच्या पथकाने माधवला हरिद्वारमध्ये अटक करून गोव्यात आणले आणि गुन्हा शाखेकडे सोपवले. गौतम खट्टरचा शोध लागत नसल्यामुळे, तसेच तो विदेशात पळून जाण्याची शक्यता असल्यामुळे त्याच्याविरोधात ‘लूक आऊट’ नोटीस जारी करण्यात आली होती. त्याच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वारंट जारी केले होते.
...असा आला गौतम पोलिसांच्या हातात
पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विकास दयेकर यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक उपनिरीक्षक श्रीराम साळगावकर यांचे पथक उत्तराखंडला पाठविण्यात आले होते. या पथकाने गौतमचा शोध सुरू केला.
गौतमने आपला मोबाईल बंद ठेवला असल्यामुळे त्याचा माग काढणे पोलिसांना कठीण जात होते. पथकाने त्याच्या मूळ घरी धडक दिली; मात्र तो सापडला नाही. अधिक चौकशी केली असता, तो एका साथीदारासह कारने प्रवास करत असल्याची माहिती मिळाली.
गौतम हिमाचल प्रदेशात शिमला येथे असल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्याबरोबर गुन्हा शाखेने हिमाचल प्रदेशच्या पोलिसांना संपर्क केला. त्यांची मदत घेऊन शुक्रवार, २४ रोजी सायंकाळी कुलू-मनाली येथे गौतम खट्टरच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
गुन्हा शाखेच्या पथकाने गौतम खट्टरला ताब्यात घेतले आहे. ट्रान्झिट रिमांड आणि अटकेची प्रक्रिया केल्यानंतर शनिवारी गुन्हा शाखेचे पथक त्याला गोव्यात घेऊन येणार आहे.