गोवा पोलिसांची कारवाई : गौतम विरोधात लूक आऊट नोटीस जारी

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : वास्को येथील सार्वजनिक कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गौतम खट्टर याचा भाऊ माधव खट्टर याला गोवा पोलिसांनी अटक केली आहे. उत्तराखंडमधील हरिद्वार येथे ही कारवाई करण्यात आली. आक्षेपार्ह भाषण माधवनेच लिहिले असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, गौतम खट्टर याच्याविरोधात लूक आउट नोटीस जारी करण्यात आली असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.
गौतम खट्टर याने वास्को येथे परशुराम जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सेंट झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. या प्रकरणी वास्को पोलीस उपनिरीक्षक डेव्हिड कॉस्ता यांनी खट्टरविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक संतोष देसाई आणि गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक डेव्हिड कॉस्ता, काॅन्स्टेबल व्यंकटेश गवंडर आणि संगमेश बिरादर यांचे पथक सोमवारी गौतम याच्या शोधार्थ उत्तराखंडला रवाना झाले होते. पथकाने मंगळवारी गौतमच्या घराची झडती घेतली; परंतु तो तिथे सापडला नाही. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकरण गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आले.
पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी बुधवारी सकाळी जबाब नोंद करण्यासाठी आयोजकांना गुन्हा शाखेत पाचारण केले होते. आयोजकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी गौतमचा भाऊ माधव खट्टर याला सहसंशयित करून त्याचा शोध सुरू केला. दरम्यान, वास्को पोलिसांचे पथक गौतम खट्टर याच्या गावी असल्यामुळे वरील माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर पथकाने बुधवारी हरिद्वार येथे दुपारी माधव खट्टर याला अटक केली. त्याला रात्री उशिरा गोव्यात आणण्यात आले. त्याच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, गौतम खट्टरचा शोध लागला नसल्यामुळे, तसेच तो विदेशात पळून जाण्याची शक्यता असल्यामुळे त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली आहे. अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विकास दयेकर याच्या नेतृत्वाखाली एक पथक पाठविण्यात आले आहे.
वादग्रस्त भाषण माधव खट्टरनेच लिहिले
आयोजकांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, गौतम खट्टरच्या उपस्थितीबाबत समन्वय आणि लॉजिस्टिक व्यवस्था करण्यासाठी त्याचा भाऊ माधवशी संपर्क केला होता. माधवने विमान तिकीट, राहण्याची व्यवस्था आणि ५१,००० रुपये या अटींवर गौतमची उपस्थिती निश्चित केली होती. माधव खट्टरनेच भाषण लिहून दिले होते. कार्यक्रमातगौतमने ते वाचून दाखवले. माधवने कार्यक्रमातील भाषण स्वतः मोबाईलवर रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केले होते.
गौतम खट्टरला दिसेल तेथून अटक करणार : मुख्यमंत्री
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गौतम खट्टर याचा शोध घेण्यासाठी गोवा पोलिसांचे पथक उत्तराखंडात गेले आहे. तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मात्र, तो दिसेल तिथून पोलीस त्याला तत्काळ अटक करून गोव्यात आणतील. या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य समोर आणले जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.