मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी ‘आयुष’ खात्याची स्थापना

सरकारमधील ५८ वे खाते : सर्वसामान्य प्रशासन खात्याकडून आदेश जारी


24th April, 11:56 pm
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी ‘आयुष’ खात्याची स्थापना

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सरकारने राज्यात ‘आयुष’ या स्वतंत्र खात्याची स्थापना झाल्याची घोषणा केली आहे. या विषयीचा आदेश सर्वसामान्य प्रशासन खात्याने जारी केला आहे. गोवा सरकारने कामकाज नियम १९८७ मध्ये दुरुस्ती करून नवे ५८वे खाते निर्माण केले आहे.
या खात्यासाठी आता स्वतंत्र मंत्री नियुक्त केला जाईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्यांचे आयुर्वेदिक क्लिनिकही होते. आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून सरकारी नोकरीही त्यांनी केली आहे. ‘आयुष’ धोरण तयार करून आयुर्वेद, होमिओपॅथी विभागांच्या विकासासाठी आवश्यकती पावले या खात्यामार्फत उचलली जाणार आहेत.
धारगळ येथे केंद्र सरकारमार्फत आयुष हॉस्पिटल स्थापन करण्यात आले आहे. याशिवाय गोव्यात आयुर्वेदिक तसेच होमिओपॅथी महाविद्यालये आहेत. आरोग्य खात्यातही आता आयुर्वेदिक डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे आयुर्वेदिक, होमिओपॅथी उपचार पद्धतींची व्याप्ती वाढत आहे. राष्ट्रीय ‘आयुष’मोहिमेसह केंद्र सरकारच्या योजनांची कार्यवाही या खात्यामार्फत केली जाणार आहे. राज्यात जी ‘आयुष’ हॉस्पिटल आणि डिस्पेन्सरी आहेत, त्यांच्यावर आयुष खात्यामार्फत नियंत्रण ठेवले जाईल. वेळगे आणि मडगाव येथे आयुष हॉस्पिटल आहेत. त्यांच्यावर आता नव्या खात्याची देखरेख असेल. राज्यात आयुष वेलनेस सेंटर स्थापन करण्याची घोषणाही सरकारने केली आहे. ही सेंटर स्थापन करण्याची जबाबदारी आयुष खात्याची राहणार आहे. राज्यात योगा, नॅच्यरोथेरपी आणि पंचकर्म उपचार पद्धतींचा प्रसार करण्याची जबाबदारी या खात्याची राहील. याशिवाय गोवा होमिओपॅथी मंडळ, आयुर्वेदिक मंडळ या कारभारांवर खात्याचे नियंत्रण असेल. आयुष शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण देणे, आयुष उपचारांवर आधारित पर्यटन सुरू करण्यासाठी खाते प्रयत्नशील राहणार आहे.