जामिनानंतर फरार होण्याच्या पार्श्वभूमीमुळे सुहैलचा जामीन फेटाळला

मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय


24th April, 11:52 pm
जामिनानंतर फरार होण्याच्या पार्श्वभूमीमुळे सुहैलचा जामीन फेटाळला

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : संशयित जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. त्याचा अनेक प्रकरणांत सहभाग असून तो सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी जामीन मिळल्यानंतर तो फरार झाला होता, असे निरीक्षण नोंदवून मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल ऊर्फ मायकल फर्नांडिस याचा चार प्रकरणांत जामीन अर्ज फेटाळून लावले आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त सत्र न्या. बाॅस्को राॅबर्ट्स यांनी दिले.
आसगाव आणि हणजूण परिसरात बनावट दस्तावेजाद्वारे जमीन हडप केल्याचे प्रकरण २०२२ मध्ये समोर आले होते. नंतर सरकारने एसआयटी नेमून अशा प्रकरणांची चौकशी सुरू केली. हणजूण आणि आसगावमधील अनेक जमिनी हडप केल्याच्या तक्रारी गुन्हा शाखेत दाखल झाल्या. एसआयटीने मोहम्मद सुहैलसह त्याच्या साथीदारांना अटक केली. एसआयटीने सुहैलविरोधात २८ गुन्ह्यांत तपास सुरू केला. काही गुन्ह्यांत मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. याच दरम्यान काही प्रकरणांत जामीन मिळल्यानंतर सुहैल फरार झाला होता. त्याला दीड वर्षानंतर एसआयटीने केपेतून पुन्हा अटक केली.
मोहम्मद सुहैलने हणजूण आणि आसगावतील मिळून चार प्रकरणांत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयात सुनावणी झाली असता, संशयित परप्रांतीय असून तो जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. त्याचा अनेक प्रकरणांत सहभाग असून तो सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी जामीन मिळल्यानंतर तो फरार झाला होता, असा युक्तिवाद सरकारी वकील दर्शन गावस यांनी करून जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली. न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून जामीन अर्ज फेटाळून लावले.