गोवा पोलिसांची आजऱ्यात कारवाई : केपेतील वृद्धाला केले होते डिजिटल अरेस्ट

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मुंबई गुन्हा शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून आणि ‘पीएफआय’शी संबंध असलेल्या मनी लाँड्रिग प्रकरणात सहभाग असल्याचे सांगून केपे तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला ६१.८४ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने मोठी कारवाई करत आजरा-कोल्हापूर येथील दयानंद बाबूराव देवळकर (४८) या संशयिताला अटक केली. संशयिताच्या बँक खात्यात वरील रकमेतील ६१ लाख रुपयांचा संशयास्पद व्यवहार झाल्याचे तपासातून उघड झाले. संशयिताला केपे येथील प्रथमवर्ग न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी केपे तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, संशयिताने तक्रारदाराला मुंबई गुन्हा शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून व्हॉट्सअॅप क्रमांकावरून कॉल केला होता. देशात बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (पीएफआय) निगडित एका मनी लाँड्रिंग प्रकरणात तक्रारदाराचा सहभाग असल्याचे खोटेच सांगितले होते. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असल्याचेही सांगितले होते. त्याला बनावट वाॅरन्ट पाठवून ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे दबाव टाकण्यात आला होता. हे प्रकरण मिटविण्यासाठी तक्रारदाराला विविध बँक खात्यांत ६१ लाख ८४ हजार २०० रुपये जमा करण्यास भाग पाडले होते. तक्रारीची दखल घेऊन पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी भारतीय न्याय संहितेच्या आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याखाली वरील व्हॉट्सअॅप मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
संशयिताची पोलीस कोठडीत रवनागी
फसवणूक प्रकरणातील ६१ लाख रुपये कोल्हापूर येथील एका बँक खात्यात जमा झाल्याचे आणि ती रक्कम विविध बँक खात्यांत वळवण्यात आल्याचे समोर आले. अधीक्षक राजू राऊत आणि साहाय्यक अधीक्षक बी. व्ही. श्रीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक नवीन नाईक, कॉन्स्टेबल सिद्धरमाया मठ आणि विनय आमोणकर हे पथक कोल्हापूरला रवाना करण्यात आले. पथकाने आजरा - कोल्हापूर येथील दयानंद बाबूराव देवळकर (४८) या संशयिताला अटक करून गोव्यात आणले. संशयिताची केपे येथील प्रथमवर्ग न्यायालयाने पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.