शापोरात दारूचे थेंब अंगावर पडल्याच्या वादातून ग्राहक- वेटरांमध्ये हाणामारी

मणीपूरी गटाच्या तक्रारीच्या आधारे डार्लिग्स बारच्या वेटरविरुद्ध गुन्हा दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
शापोरात दारूचे थेंब अंगावर पडल्याच्या वादातून ग्राहक- वेटरांमध्ये हाणामारी

म्हापसा : दारूचे थेंब अंगावर पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून ग्राहक आणि वेटरमध्ये हाणामारी होण्याचा प्रकार शापोरा येथील डार्लिंग्स बारमध्ये घडला. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी सदर बारच्या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून फिर्यादी पीडित मणीपुरी गट हा कळंगुटमध्ये एका सलूनमध्ये नोकरीला आहे.

ही घटना गुरुवार दि. १६ एप्रिल रोजी उत्तर रात्री १२.३० ते पहाटे ३ वा. दरम्यान घडली होती. याप्रकरणी न्गाओवेनी क्यापोसाई (रा. हणजूण व मूळ मणीपूर) हिने पोलिसांत तक्रार दिली. मारहाणीत फिर्यादीचा चुलत भाऊ डी. खोहरीलू उर्फजोजो (२४), डी. पहरील (१९), ग्रासेसन गंगमेल (२५), मेरांगचिबा वालींग (२६), शिम्मेई आऊंगशी (२४) व सोमाबाई झिमिक (२७) हा गट जखमी झाला. त्यातील डी. पहरील याच्या नाकाला जबर जखम झाली आहे. या सर्वांवर म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात आले.

दि. १५ रोजी रात्री फिर्यादी व तिचे चार मित्र असा पाच जणांचा मणीपुरी युवा गट शापोरा येथील डार्लिंग बारमध्ये पार्टी करण्यासाठी आला होता. हा गट मद्यपान व जेवण करत असताना बारच्या एका वेटरचा तोल गेला व हातातील ट्रे मधील ग्लासातील दारूचे काही थेंब या ग्राहक गटातील एका युवकावर पडले. संशयित वेटर हा दुसऱ्या ग्राहकाला देण्यासाठी ही दारू नेत होता.

अंगावर दारुचे थेंब पडताच सदर युवकाने त्या वेटरला शिवीगाळ केली आणि त्याच्या अंगावर आपल्या ग्लासमधील दारू फेकून मारली. त्यामुळे बारचे वेटर आणि या गटात बाचाबाची आणि हातघाई झाली.

त्यानंतर फिर्यादी गट बारमधून निघून गेला आणि आपल्या दोघा मित्रांना सोबत घेऊन ते पुन्हा बारमध्ये आले. त्यांनी सामानाची तोडफोड करीत बारच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्याबरोबर संशयित वेटरनी या गटालाही प्रत्युतर देत मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना उपचारार्थ इस्पितळात दाखल केले.

चारही संशयित आरोपींना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

परस्परविरोधी तक्रार दाखल

याप्रकरणी पोलिसांत दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रार दाखल केली होती. तसेच मंगळवारी फिर्यादी गटाने सोशल मीडियावर आपल्याला जखम झालेले फोटो व्हायरल केले आहेत. याप्रकरणी फिर्यादींच्या तक्रारीच्या आधारे हणजूण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या ११६(१), ३५१(३), ३५२ व ३(५)स कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा