उच्च न्यायालयाचे पणजी महानगरपालिकेला निर्देश

पणजी : येथील मळा तलावाच्या परिसरात असलेल्या घरांची पाहणी करून त्यातून सांडपाणी थेट तलावात सोडले जात आहे का, याची खात्री करून अहवाल सादर करा, असा निर्देश गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने पणजी महानगरपालिकेला दिला. तसेच या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतलेल्या नमुन्यांचे अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवार २७ रोजी होणार आहे.
मागील आठवड्यात मळा तलावात मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत आढळून आले होते. याची दखल घेऊन महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच मत्स्यव्यवसाय खात्याचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन नमुने गोळा करून नेले होते. गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने या घटनेची स्वेच्छा दखल घेतली. या प्रकरणी मंगळवारी न्यायालयात सुनावणी झाली असता, न्यायालयाला मदत करण्यासाठी अॅड. नाईजल फर्नांडिस यांची अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्ती केली.
दरम्यान, घटनेची माहिती समोर आली त्यावेळी पाण्यातील ऑक्सिजनची पातळी खूप कमी होती. त्यानंतर जलस्रोत खात्याने तळ्याचे दरवाजे उघडले. त्यामुळे काही प्रमाणात ऑक्सिजनची पातळी वाढली आहे. प्रथमदर्शनी मासळी मृत्यूची तीन कारणे असू शकतात. त्यात तलावातील साचलेले पाणी, पाण्यावर शेवाळ झाला, सांडपाण्याचे विसर्ग हे तीन कारणे असू शक्यता. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतलेल्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर कारण काय होते हे समजणार असल्याची माहिती अॅडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी न्यायालयात दिली. तसेच काही प्रशासकीय यंत्रणांना प्रतिवादी करण्यास सांगितले. याची दखल घेऊन न्यायालयाने वरील आदेश जारी करुन पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी ठेवली आहे.