केरळमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू

पाच जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक


2 hours ago
केरळमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
त्रिशूर : केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील मुंडथिक्कोडु भागात मंगळवारी एका फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. शहरात होणाऱ्या ‘त्रिशूर पूरम’ या वार्षिक हिंदू मंदिर उत्सवाची तयारी सुरू असतानाच ही दुर्घटना झाली. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
घटनेच्या ठिकाणी पोहोचलेल्या राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्फोट झाला त्यावेळी कारखान्यात सुमारे ४० लोक काम करत होते. आयोजकांनी कर्मचाऱ्यांसाठी दुपारचे जेवण आणले होते. सात जण तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्रिशूर पूरमच्या ‘थिरुवंबाडी’ गटासाठी आतषबाजीचे नमुने (सॅम्पल्स) तयार केले जात असताना हा स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून ५ जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
घटनास्थळी स्फोटक साहित्याचा साठा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्याचा साठा होता. त्याला आग लागल्याने जोरदार स्‍फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार सुमारे ४० जण जखमी झाले होते, त्यापैकी किमान आठ जणांची प्रकृती गंभीर होती. घटनेनंतर लगेचच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आणि प्रशासनाने त्रिशूर मेडिकल कॉलेजसह आसपासच्या रुग्णालयांना आणीबाणीच्या स्थितीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले.