मानसिक आरोग्यासाठी ‘मोबाईल पार्किंग’ची गरज

मुख्यमंत्र्यांचे उद्गार : डिजिटल व्यसनावर उपाययोजना आवश्यक


31 mins ago
मानसिक आरोग्यासाठी ‘मोबाईल पार्किंग’ची गरज

कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी मोबाईलचा मर्यादित वापर करून ‘मोबाइल पार्किंग’ची सवय लावणे गरजेचे आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. देवा फार्मा आणि अहंत फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑटीजम स्पेक्ट्रम डिसऑर्डर अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.
व्यासपीठावर अहंत फाऊंडेशनच्या संस्थापक सोनाली पाटणकर व इतर उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात मोबाईलचा वापर वाढला असला तरी त्याचे दुष्परिणामही समोर येत आहेत. धूम्रपान किंवा मद्यपानाप्रमाणेच अनेकांना मोबाईलचे व्यसन लागले आहे. या व्यसनाचा त्यांच्या झोप आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. जसे आपण वाहन पार्क करतो, तसेच काही वेळ मोबाईलपासून दूर राहणे आवश्यक आहे. डिजिटल साधनांचा वापर आवश्यक असला तरी त्याचे व्यसन टाळणे आणि संतुलित वापर करणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्य जपण्यासाठी मोबाईलपासून काही काळ दूर राहण्याची सवय लावून घेतली पाहिजे.

अहंत फाऊंडेशनने ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर विषयक प्रशिक्षण उपक्रम सुरू केला असून आतापर्यंत १,१२० जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. लहान वयात (३ ते ५ वर्षे) ऑटिझम ओळखल्यास उपचार सोपे होतात, असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सायबर वेलनेस क्लिनिकची गरज
धूम्रपान, मद्यपान याप्रमाणेच बऱ्याच जाणांना मोबाईलचे व्यसन जडले आहे. ‘मोबाईल पाहिला नाही तर मला झोप येत नाही’, असे काही जण सांगतात. मला वाटते मोबाईल पहात असल्यामुळे त्यांना झोप येत नाही. डिजिटल व्यसनाच्या वाढत्या समस्येवर उपाय म्हणून सायबर वेलनेस क्लिनिक सुरू करण्याची आवश्यकता आहे. मोबाईलला विश्रांती देऊन वाचन, लेखन किंवा इतर उपक्रमांकडे वळल्यास एकाग्रता आणि मानसिक शांतता वाढू शकते, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

हेही वाचा