पाच वर्षांत १.९७ लाख जणांना २९११ कोटींचे मुद्रा कर्ज वितरित

राज्यात एससी, एसटी, ओबीसीना २६३ कोटींचे मुद्रा कर्ज वाटप

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th April, 11:41 pm
पाच वर्षांत १.९७ लाख जणांना २९११ कोटींचे मुद्रा कर्ज वितरित

पणजी : राज्यात २०१९-२० ते २०२३-२४ या पाच आर्थिक वर्षात एकूण १ लाख ९७ हजार ७६० जणांना २९११.४४ कोटी रुपये मुद्रा कर्ज वितरित करण्यात आले. यातील ४२ हजार ४७ (२१.२६ टक्के) लाभार्थी हे एससी, एसटी, ओबीसी समाजातील उद्योजक आहेत. या तीन समुदायांतील उद्योजकांना मुद्रा योजनेअंतर्गत २६३.५४ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. ही रक्कम एकूण कर्ज रकमेच्या ९ टक्के इतकी आहे. केंद्रीय अर्थ खात्याने जारी केलेल्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
अहवालानुसार, वरील कालावधीत मुद्रा योजनेंतर्गत राज्यात एससी समाजातील ५,२५४ उद्योजकांना २९.८२ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. एसटी समाजातील २,७३१ उद्योजकांना १७.५० कोटी रुपये कर्ज वितरित करण्यात आले. ओबीसी समाजातील ३४ हजार ६२ उद्योजकांना २१६.२२ कोटी रुपये कर्ज देण्यात आले. तर सर्वसाधारण प्रवर्गातील १ लाख ५५ हजार ७१३ उद्योजकांना २,६४७.९१ कोटी रुपये कर्ज वितरित करण्यात आले. वरील कालावधीत राज्यात विविध समाजातील मिळून ९४ हजार ३८३ महिलांना ७७१.०८ कोटी रुपये कर्ज देण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत संपूर्ण देशात २०१५ ते २०२५ दरम्यान ५१.६८ कोटी व्यक्तींनी ३२.६१ लाख कोटी रुपये कर्ज वितरित करण्यात आले आहे. योजनेमध्ये २०१८ आणि २०२३ मध्ये काही बदल करण्यात आले. २०१९ नंतर जातनिहाय झालेल्या कर्जांची नोंद ठेवण्यात आली. योजनेद्वारे कर्ज घेऊन त्याची वेळेत परतफेड करणाऱ्यांसाठी तरुण प्लस हा नवीन विभाग सुरू करण्यात आला आहे. सध्या मुद्रा कर्ज योजनेत शिशू, किशोर, तरुण आणि तरुण प्लस असे चार विभाग करण्यात आहेत. शिशू विभागात ५० हजार रुपये पर्यंत, किशोर विभागात ५० हजार ते ५ लाख, तरुण विभागात ५ ते १० लाख, तर तरुण प्लस विभागात १० ते २० लाख रुपये पर्यंत कर्ज देण्यात येते.

हेही वाचा