ख्रिस्तींसह हिंदू भाविकांचेही श्रद्धास्थान : शेजारील राज्यांतील भाविकांनीही लावली उपस्थिती

म्हापसा : भक्तांच्या हाकेला धावणारी सायबीण म्हणून ख्रिश्चन तसेच हिंदू व इतर समाजातील भाविकांत श्रद्धा असलेल्या म्हापसा येथील मिलाग्रीस सायबिणीचे फेस्त भक्तिभावाने सोमवारी साजरे झाले. ईस्टरच्या तिसऱ्या सोमवारी साजरे होणाऱ्या या फेस्ताला गोव्याबरोबरच शेजारील राज्यातील भक्तगणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. फेस्तावेळी मिलाग्रीस सायबीण व तिच्या कडेवरील येसू ख्रिस्त यांच्या पुतळ्यावर भक्तांनी तेल, फुले व मेणबत्ती वाहिल्या.

मिलाग्रीस सायबिणीच्या फेस्तानिमित्त सेंट जेरॉम चर्चमध्ये पहाटे ५.३० पासून संध्याकाळपर्यंत प्रार्थना झाल्या. या प्रार्थना कोकणी व इंग्रजीमध्ये झाल्या. सकाळी १० वा. फेस्ताची मुख्य प्रार्थना धर्मगुरू फा. केनेथ तेलीस यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यावेळी फा. लिओनार्डो मोराईस, फा. सावियो जे. पिंटो व फा. आगुस्तीन आल्फोन्सो व इतर उपस्थित होते.
तत्पूर्वी चर्चमधील मिलाग्रीस सायबीण व तिच्या कडेवरील येसू ख्रिस्त यांच्या डोक्यावर क्रॉऊन मुकूट घालण्यात आला. दरवर्षीप्रमाणे फेस्तानिमित्त चर्चतर्फे दि. ९ पर्यंत पाच दिवस विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये खेळ, पाककला, हाउझी तसेच २० रोजी सायं. ७.३० वा. ‘केल्ल्या मापान भोग’ हा तियात्र सादर करण्यात आला. तर २१ रोजी ‘बुधवंत जाकी’ हा तियात्र, दि. २२ रोजी व २३ रोजी डिजे कार्यक्रम आणि २४ रोजी ‘नाचो या कुंपासार’ हा चित्रपट सादर होईल.
चर्च ते अलंकार थिएटर व चर्च ते कोमुनिदाद घर पर्यंतची परिसरातील दोन्ही रस्त्यांच्या बाजूला वर्षपद्धतीने फेरी थाटली गेली आहे. यात कपडे, खेळणी, मिठाई, चणे, घरगुती सजावटीमया वस्तू, फर्निचरचे स्टॉल्स आहेत. म्हापसा पालिकेने बर्याच काळानंतर यंदा या फेरीला एकत्रीत ९ दिवसांची परवानगी दिली असून ही फेरी २९ एप्रिलपर्यंत असेल.

शिरगावहून सायबिणीला तेल,
म्हापशाहून लईराईला फुले देण्याची परंपरा
मिलाग्रीस सायबीण ही शिरगावच्या श्री लईराई देवीची बहीण म्हणून भक्तगणांत ओळखली जाते. श्री लईराईची जत्रा यंदा २१ एप्रिल म्हणजेच उद्या साजरी होणार आहे. शिरगावहून मिलाग्रीस सायबिणीला तेल तर म्हापशाहून देवी लईराईला फुले भेट देण्याची परंपरा आहे. ही परंपरा कित्येक वर्षांपासून अखंडीत चालू आहे. म्हापशातील धार्मिक सलोखा राखणारा हा एकमेव फेस्ताचा उत्सव आहे. 
नवसाला पावणारी देवी
नवसाला पावणारी देवी म्हणून मिलाग्रीस सायबिणीवर भक्तगणांची श्रद्धा असून यामुळे सायबिणीला तेल, मेणबत्ती, पैसे, फुले, मेणापासून बनवलेल्या मानवी शरीराचे अवयव तसेच साडी अर्पण करतात. या दिवशी भाविक नारळाची कवटी घेऊन भीक मागतात व आपले नवस फेडतात. ख्रिश्चन बांधवासह हिंदू व इतर समाजातील लोक या फेस्तात सहभागी होत असल्याने फेस्ताला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.