सावरधाट-लाटंबार्से येथील प्रकार : डिचोली पाणीपुरवठा कार्यालयावर धडक

डिचोली येथील पाणीपुरवठा खात्यात उपस्थित राहिलेले धोंड भक्तगण.
डिचोली : सावरधाट येथील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, शिरगावच्या श्री देवी लईराईचे ११० व्रतस्थ धोंड भक्त या गावात राहतात. त्यांना दररोज आपले पावित्र्य राखण्यासाठी पाण्याची नितांत गरज असते. मात्र, या पाणीटंचाईमुळे धोंड भक्तांना व्रत पाळण्यात अडचणी निर्माण झाल्या.
सोमवारी दुपारी धोंड भक्तांनी डिचोली येथील पाणीपुरवठा विभागाला भेट दिली. त्यावेळी सहाय्यक अभियंता उपस्थित नसल्याचे त्यांना कळले. भक्तांनी आपले निवेदन विभागाकडे सादर करून पाणीटंचाईचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी केली आहे.
सध्या गावात आठवड्यातून फक्त एकदाच पाण्याचा टँकर येतो. टँकर चालकाकडे विचारणा केल्यास तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. आठवड्यातून एकदाच येणाऱ्या टँकरवर संपूर्ण गावाचा उदरनिर्वाह कसा चालणार, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. गेल्या आठवडाभरापासून गावात पाण्याचा तुटवडा असून, पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांची मोठी धडपड सुरू आहे. दरम्यान, पाणीप्रश्नी ग्रामस्थांनी पाणी खात्यावर धडक देऊन त्वरित प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली?
या समस्येबाबत जानेवारी महिन्यात पाणीपुरवठा विभागाला रीतसर निवेदन देण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, त्या निवेदनावर खुद्द मुख्यमंत्र्यांचा कारवाईसाठी शेरा असूनही विभागाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. यावेळी जि.पं. सदस्य पद्माकर मळीक यांनी पाणीपुरवठा खात्यात भेट दिली असता, संतप्त धोंड भक्तांनी त्यांना जाब विचारला; मात्र त्यांच्याकडेही ठोस उत्तर नव्हते.