पोलीस अधीक्षकांकडून स्पष्ट : विविध संघटनांसह नागरिक पोलीस मुख्यालयाबाहेर

मडगाव : सेंट फ्रान्सिस झेविअर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. मडगाव पोलीस (Margao Police) मुख्यालयाबाहेर राजकीय पक्षांसह संघटनांनी पोलीस अधीक्षकांची (Superintendent of Police) भेट घेत गौतम खट्टर याच्या अटकेची मागणी केली. पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांनी खट्टर यांच्यावर वास्को पोलिसात गुन्हा नोंद झालेला असून; कायद्यानुसार पुढील कारवाई होईल, असे स्पष्ट केले.
गोयचो सायब म्हणून राज्यासह जगभरातील ख्रिस्ती बांधव सेंट फ्रान्सिस झेविअर यांना मानतात. वास्को (Vasco) येथील सनातन धर्म रक्षा समिती मुरगाव यांच्यातर्फे आयोजित भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात गौतम खट्टर यांनी सेंट झेविअरबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केली. यानंतर काँग्रेस, आम आदमी पक्ष, आरजी, गोवा फॉरवर्ड या पक्षांसह सामाजिक संघटना व ख्रिस्ती बांधवांकडून संतप्त प्रतिक्रिया आल्या. सोमवारी सकाळी मडगाव येथील पोलीस मुख्यालयानजीक अनेक नागरिकांनी एकत्र येत गोयचो सायबाचा अवमान करणार्या व्यक्तीच्या अटकेची मागणी केली.
आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांची भेट घेत कारवाईची मागणी केली. त्यानंतर ओलेंसिओ सिमोईस, वॉरेन आलेमाव, प्रतिमा कुतिन्हो यांनीही नागरिकांसह पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांची भेट घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक सिध्दांत शिरोडकर यांच्यासह मडगाव, कोलवा, कुंकळ्ळी, फातोर्डा, मायना कुडतरी येथील पोलीस निरीक्षकांची उपस्थिती होती. पोलीस मुख्यालयाचे मुख्य प्रवेशव्दार बंद करण्यात आलेले होते व ठराविक लोकांनाच भेटीसाठी पाठवण्यात येत होते.
पोलिस अधीक्षकांच्या भेटीवेळी नागरिकांनी सांगितले की, सेंट फ्रान्सिस झेविअर यांच्याबाबत वास्को येथील कार्यक्रमात बोलताना गौतम खट्टर याने चुकीचे शब्द वापरलेले आहेत. यामुळे लोक संतापले असून; धार्मिक भावना दुखावल्या आहेत. केवळ गुन्हा नोंद करून होणार नाही तर वक्तव्य करणार्या गौतम खट्टर याला जिथे असेल तिथून ताब्यात घेत अटक करण्यात यावी. यापूर्वी सुभाष वेलिंगकर यांनीही वादग्रस्त विधाने केलेली होती व लोकांनी रस्ते बंद केलेले होते.
लोकांनी कायदा हातात घेऊ नये असे वाटत असल्यास खट्टर याला तत्काळ अटक करण्यात यावी. त्याला यापुढे कायमची गोव्यात बंदी घालावी. याशिवाय ज्या संघटनेने खट्टर याला बोलावले होते, त्यांना यापुढे कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाला बंदी घालण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या चुप्पीवरही नागरिकांनी निषेध व्यक्त करत सरकारने अशा मंत्र्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.
विविध शिष्टमंडळांची भेट घेतल्यानंतर दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांनी सांगितले की, वास्को येथील कार्यक्रमावेळी सेंट फ्रान्सिस झेविअर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गौतम खट्टर याच्याविरोधात वास्को पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. प्राधान्याने कायद्यानुसार यापुढील जी कारवाई असेल ती नक्कीच केली जाईल, असे सांगितले. तसेच सुभाष वेलिंगकर यांच्याविरोधातील प्रकरणात न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचेही स्पष्ट केले.