श्री लईराई देवीच्या दर्शनाची लागली आस, पाऊले चालती शिरगावची वाट!

Story: भास्कर देसाई। गोवन वार्ता |
23 mins ago
श्री लईराई देवीच्या दर्शनाची लागली आस, पाऊले चालती शिरगावची वाट!

पणजी : ‘श्री लईराई देवीच्या दर्शनाची लागली आस, पाऊले चालती शिरगावची वाट!’ असे अनोखे चित्र सध्या शिरगावात पहायला मिळत आहे. पारंपारिक वेश, हातात सजवलेली बेतकाटी, गळ्यात मोगऱ्याच्या फुलांच्या माळा आणि प्रसन्न वातावरणात श्री लईराई देवीच्या (Shirgao Jatra festival) जयघोषात धोंड, भाविकांची पाऊले शिरगावच्या दिशेने पडत आहेत.

गेले कित्येक दिवस पाळलेले व्रत, केलेले उपवास, सोवळे-ओवळे याची फलश्रुती आता होणार आहे. धगधगत्या होमकुंडातून पायी चालत जाऊन अग्नीदिव्य केल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याची फलश्रुती होणार आहे. या दिव्य ओढीनेच गोवा तसेच गोव्याबाहेरील धोंड, भाविक शिरगावकडे चालले आहेत. शिरगावच्या दिशेने निघालेला रस्ता मंत्रमुग्ध करणाऱ्या एका वेगळ्या वातावरणाने भरून गेला आहे. भावभक्तीचे एक अनोखे रुप याठिकाणी पहायला मिळत आहे. श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवासाठी (Shri Lairai Devi, Jatra) धोंड, भाविकांची एकच रांग लागली आहे. 


मंदिरात जाऊन श्री लईराई देवीचे दर्शन घेतल्यानंतर जवळच अग्नीदिव्यासाठी तयार करण्यात आलेल्या होमकुंडात लाकडे टाकताना भाविक स्वत:ला विसरून जात आहेत. परिसरात मोगऱ्याच्या फुलांच्या सुगंधाने एक वेगळेच वातावरण तयार झाले आहे. मोगऱ्याचे कळे श्री लईराई देवीला प्रिय. त्यामुळे मोगऱ्याच्या फुलांना मोठी मागणी आहे. या मोगऱ्याच्या कळ्यांत भाविक आपले आराध्य दैवत श्री लईराई देवीचे अस्तित्त्व शोधत आहेत.  


गेल्या वर्षी या जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीनंतर दुर्घटनेचे गालबोट लागल्याने; यावर्षी श्री लईराई संस्थान समिती, राज्य सरकार आणि प्रशासनाने खबरदारी म्हणून निर्बंध लागू केले आहेत. त्याचबरोबर आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. धोंड, भाविक यांना तळ्यावर स्नानासाठी, दर्शनासाठी येण्या-जाण्याचे मार्गही नि‌श्चित करण्यात आले आहेत. दुकानांची संख्याही कमी करण्यात आली आहे. धोंडांबरोबर इतर भाविकांनी गर्दी करू नये; यासाठीही नियमावली करण्यात आली आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. श्री लईराई देवीच्या मंदिर परिसरातील संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेरांच्या देखरेखीखाली आहे. एकूण श्री लईराई संस्थान सम‌िती,  प्रशासनाने याठिकाणी चोख व्यवस्था केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी घेतला आढावा

मुख्यमंत्री (Chier Minister)  डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मंगळवारी सकाळी श्री लईराई देवीचे दर्शन घेतले. आणि श्री लईराई संस्थान समिती, सरकारी अधिकारी यांच्याकडून एकूण व्यवस्थेचा आढावा घेतला. सर्वांनी शिस्तीचे पालन करताना गोंधळ न करता शांततेने श्री लईराई देवीचे दर्शन घ्यावे. कुणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहन श्री लईराई संस्थान समिती, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. धोंड, भाविक यांच्याबरोबर आमदार, मंत्री, लोकप्रतिनिधीही श्री लईराई देवीचे दर्शन घेत आहेत.


एकूण श्री लईराई देवीच्या भक्तीचा जागर आजपासून सुरू झाला आहे. उद्यापासून कौलाला सुरूवात होणार आहे. दर्शनासाठी लागलेली रांग पुढील काही दिवस सुरूच राहणार आहे. श्री लईराई देवीचा जयघोष व मोगऱ्याच्या सुगंधात परिसर भरून जाणार आहे. ‘दिव्यताची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती’ असेच हे एकूण वातावरण आहे. 

हेही वाचा