
मडगाव : दवर्ली येथे इलेक्ट्रिक हिटर रॉडचा वापर करताना विजेचा तीव्र धक्का बसल्याने एका २९ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेश्मा सलीम नदाफ (रा. मोतीडोंगर, मडगाव; सध्या रा. मारुती मंदिराजवळ, दवर्ली) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वा. च्या सुमारास रेश्मा या आपल्या राहत्या घरी पाणी गरम करण्यासाठी इलेक्ट्रिक हिटर रॉड हाताळत होत्या. याच दरम्यान त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्या बेशुद्ध पडल्या.
त्यांना तातडीने मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले, मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मायना-कुडतरी पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद केली आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून, विजेच्या धक्क्यामुळेच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. पुढील तपासासाठी ‘व्हिसेरा’ राखून ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या घटनेत कोणताही घातपाताचा प्रकार नसल्याचे समोर आले आहे. ही केवळ एक दुर्घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.