जुने गोवे चर्च परिसरात बेशिस्त पार्किंगचा विळखा

वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा : वाहतूक पोलिसांकरवी नियंत्रण ठेवण्याची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
जुने गोवे चर्च परिसरात बेशिस्त पार्किंगचा विळखा

जुने गोवे येथील बाॅम जेसलिका चर्चच्या बाजूच्या रस्त्यावर ‘नो पार्किंग’ झोनमध्ये आरक्षित केलेली वाहने. (रामानंद तारी)

माशेल : जुने गोवे परिसरात पर्यटकांची वाढती गर्दी आणि त्यासोबत वाढलेले बेशिस्त पार्किंग यामुळे वाहतूक व्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या या भागात दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असते. मात्र, त्यानुसार वाहतूक नियोजन व अंमलबजावणी होत नसल्याने नागरिक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी वाहनचालक, प्रवासी व नागरिकांत संतापाचे वातावरण पसरले आहे.
जुने गोवे परिसरात पार्किंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली असतानाही टॅक्सीचालक व दुचाकीस्वार मनमानीपणे बाॅम जेसलिका चर्चच्या बाजूच्या हमरस्त्यांच्या कडेला, चौकांमध्ये तसेच ‘नो पार्किंग’ फलकासमोरच वाहने उभी करत असल्याचे वारंवार दिसून येते. काही ठिकाणी तर रस्त्याच्या अर्ध्या भागावरच वाहनांची रांग लागल्याने वाहतुकीसाठी अत्यंत कमी जागा शिल्लक राहते. परिणामी, वाहने अडकून पडण्याचे प्रकार रोजचेच झाले आहेत.
स्थानिकांच्या मते, वाहतूक पोलिसांकडून या समस्येकडे अपेक्षित ती गांभीर्याने दखल घेतली जात नाही. अनेकदा पोलीस कर्मचारी परिसरात अनुपस्थित असल्याचे दिसते, तर काही वेळा उपस्थित असूनही नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याची तक्रार नागरिक व प्रवासी करीत आहे. त्यामुळे विशेषतः पर्यटक वाहनचालकांमध्ये कोणतीही भीती राहिलेली नाही.
या बेशिस्त पार्किंगमुळे परिसरात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून, स्थानिकांसह पर्यटकांनाही त्याचा मोठा फटका बसत आहे. विशेषतः सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक ठप्प होते. आपत्कालीन सेवांनाही या कोंडीमुळे अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ‘नो पार्किंग’ झोन असूनही, शिवाय त्यासंबंधीचे नामफलक तिथे लावले असूनही पर्यटक वाहनचालक बिनधास्तपणे येथे वाहने आरक्षित करतात तेव्हा अशा फलकांचा उपयोग काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, नियमित पोलीस बंदोबस्त, तसेच प्रभावी वाहतूक नियोजन यांची अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरत आहे. जुने गोवे पंचायत व पोलीस प्रशासनाने समन्वयाने कार्य करून वाहतूक शिस्त प्रस्थापित करावी, अन्यथा ही समस्या आणखी गंभीर होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
गवंडाळी येथे नियमांचे उल्लंघन
गवंडाळी येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या मार्गावर वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. मात्र, बॅरिकेड्स आणि सूचना फलक लावूनही अनेक वाहनचालक या प्रतिबंधित मार्गावरून बिनधास्त ये-जा करत आहेत. यामुळे पुलाच्या कामात अडथळे निर्माण होत असून, पोलीस समोर असतानाही हे उल्लंघन सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा