अग्निशमन दलातील भरतीसाठी 'आयटीआय'चा विशेष कोर्स अनिवार्य होणार : मुख्यमंत्री डॉ. सावंत

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
अग्निशमन दलातील भरतीसाठी 'आयटीआय'चा विशेष कोर्स अनिवार्य होणार : मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी : पुढील वर्षापासून आयटीआयमध्ये (ITI) 'अग्निशमन सेवा' हा एक वर्षाचा विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. अग्निशमन दलात जवान म्हणून भरती होण्यासाठी हा अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. सोमवारी पणजी येथे आयोजित 'करिअर जागोर' कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, एससीईआरटीच्या संचालिका मेघना शेटगावकर, भूषण सावईकर, गोविंद पर्वतकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आज विद्यार्थ्यांना एआय (AI), रोबोटिक्स, डिजिटल मीडिया आणि सायबर सुरक्षा अशा अनेक नवीन करिअर संधी उपलब्ध आहेत. एखाद्या पदासाठी ३० वर्षांपूर्वी ठरवण्यात आलेली पात्रता आताच्या काळात लागू होत नसेल, तर ती बदलणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्य सरकार भरती नियमांत (RR) बदल करत आहे. यापूर्वी अग्निशमन दलात जवान पदासाठी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण ही पात्रता होती, आता त्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात अन्य आधुनिक अभ्यासक्रमांनुसार इतर विभागांचे भरती नियमही बदलले जातील.

ते पुढे म्हणाले की, 'करिअर जागोर' उपक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाला करिअर मार्गदर्शनाचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षित शिक्षक आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे 'करिअर राजदूत' म्हणून काम करतील. शिक्षकांनी विद्यार्थी आणि त्यांच्या करिअरमधील दुवा बनावे. विद्यार्थ्यांची आवड ओळखून त्यांना योग्य दिशा दाखवावी. गोव्याचे भविष्य आजच्या युवा पिढीच्या हातात असून, त्यांना योग्य करिअर निवडण्यासाठी मदत मिळणे गरजेचे आहे.

शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा विचार

प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांना एससीईआरटीकडून (SCERT) करिअर मार्गदर्शक म्हणून नियुक्तीपत्र दिले जाईल. अशा शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता (इन्सेंटिव्ह) देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे. तसेच, करिअर मार्गदर्शन न करणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई करण्याचा विचारही सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

हेही वाचा