सेंट फ्रान्सिस झेवियरबद्दलच्या 'त्या' विधानाचा गोव्यात निषेध

धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या गौतम खट्टरवर कठोर कारवाईसाठी सत्ताधारी-विरोधक एकवटले

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th April, 11:03 am
सेंट फ्रान्सिस झेवियरबद्दलच्या 'त्या' विधानाचा गोव्यात निषेध

पणजी: फ्रान्सिस झेवियर (गोंयचो सायब) यांच्याबद्दल वास्को येथील कार्यक्रमात गौतम खट्टर याने केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद अवघ्या गोव्यात उमटले आहेत. खट्टर याने आपल्या भाषणात झेवियर यांचा उल्लेख 'दहशतवादी' असा केल्याने गोमंतकीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून, या कृत्याचा सर्वच स्तरांतून तीव्र निषेध केला जात आहे. याप्रकरणी वास्को पोलिसांनी आधीच एफआयआर नोंदवला असून, आता संशयिताला त्वरित अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गोव्याची ओळख असलेल्या धार्मिक सलोख्याला तडा देण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे सांगत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकजुटीने या विधानाचा निषेध केला आहे.




कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी या विधानाचा कडक शब्दांत निषेध करताना म्हटले की, जात, धर्म किंवा पंथ बाजूला ठेवून सर्व गोमंतकीय या बेजबाबदार विधानाचा निषेध करत आहेत. 'गोंयचो सायब' आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहेत. खट्टर सारख्या व्यक्तीने प्रसिद्धीसाठी किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी गोव्यातील शांतता आणि एकोपा बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, अशा द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तींना गोव्यात कोणतेही स्थान मिळता कामा नये आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांपासूनही जनतेने लांब राहावे, असे आवाहन लोबो यांनी केले.



रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे (आरजीपी) नेते मनोज परब यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. गौतम खट्टर याने वास्कोमध्ये केलेले द्वेषपूर्ण भाषण हे केवळ ख्रिश्चन बांधवांच्याच नव्हे, तर संपूर्ण गोमंतकीयांच्या भावना दुखावणारे आहे, असे परब यांनी म्हटले आहे. त्यांनी खट्टरवर कडक कायदेशीर कारवाईसह गोव्यातील कोणत्याही सार्वजनिक व्यासपीठावर बोलण्यास आजन्म बंदी घालण्याची मागणी केली आहे. आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांनीही या विधानाचा निषेध करत, सेंट फ्रान्सिस झेवियर यांची प्रतिष्ठा राखण्यासाठी आणि गोव्याचा सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी पोलिसांनी तातडीने पावले उचलणे गरजेचे असल्याचे सांगितले.



गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी या प्रकरणावरून राज्य सरकार आणि पोलिसांना धारेवर धरले आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर यांना 'दहशतवादी' संबोधणे हा जगभरातील कोट्यवधी भाविकांचा अपमान आहे. हे अत्यंत बेजबाबदार वक्तव्य असून त्याचे परिणाम समाज विघातक ठरण्याची शक्यता आहे, असे सरदेसाई म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन करत, खट्टर याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. गोव्याची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध 'झिरो टॉलरन्स' धोरण राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.



काँग्रेस पक्षानेही या घटनेवर आक्रमक भूमिका घेतली आहे. दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले की, हे गोव्यातील जनतेत फूट पाडण्याचे एक सुनियोजित कारस्थान आहे. वास्कोमध्ये मंत्री आणि आमदारांच्या उपस्थितीत, तर पणजीमध्ये अन्य एका कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत अशी विधाने होणे हे भाजपच्या प्रशासकीय अपयशाचे लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसने या कृत्याला जबाबदार असणारे वक्ते, आयोजक आणि उपस्थित नेते या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.



दुसरीकडे, ॲडव्होकेट प्रतिमा कुतिन्हो यांनी या घटने विरुद्ध कायदेशीर लढा पुकारला आहे. त्यांनी खट्टर विरुद्ध औपचारिक तक्रार दाखल करण्यासाठी २० एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता मडगाव पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने जमा होण्याचे आवाहन जनतेला केले आहे. हे विधान म्हणजे गोमंतकीयांच्या अस्मितेवर आणि विश्वासावर झालेला हल्ला आहे, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, सोशल मीडियावरही या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. फेसबुक, एक्स (ट्विटर) आणि व्हॉट्सॲपवर हजारो गोमंतकीयांनी 'गोंयचो सायब' यांच्याबद्दलच्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध केला असून, गोव्याच्या धार्मिक सलोख्याशी खेळणाऱ्यांना अद्दल घडवण्याची मागणी लावून धरली आहे.

हेही वाचा