
लखनौ : किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी (KGMU) मध्ये निवासी डॉक्टर असल्याचे भासवून विद्यार्थिनींना जाळ्यात ओढणाऱ्या आणि धर्मांतर रॅकेट चालवणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हसाम अहमद नावाच्या एका बनावट डॉक्टरसह, पॅथॉलॉजी विभागातील खरा डॉक्टर रमीझ उद्दीन नायक आणि त्याच्या पालकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
चित्रपटात शोभावा असा बनावटपणा करत हसाम अहमद याने स्वतःची ओळख केजीएमयूचा निवासी डॉक्टर म्हणून निर्माण केली होती. त्याने 'कार्डिओ सेवा संस्थान ट्रस्ट' नावाची एक बनावट संस्था स्थापन केली. विशेष म्हणजे, या संस्थेच्या 'डिस्प्ले पिक्चर'वर केजीएमयूचे प्रवक्ते डॉ. के. के. सिंह यांचा फोटो वापरून त्याने सर्वांचा विश्वास संपादन केला. या संस्थेच्या माध्यमातून तो विद्यार्थिनींना मुस्लिम बहुल भागातील शिबिरांमध्ये घेऊन जात असे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसामने केवळ लखनौच नव्हे तर इतर दोन वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थिनींनाही लक्ष्य केले होते. दिल्लीतील एम्स (AIIMS) येथे एका परिषदेसाठी नेण्याचे आमिष दाखवून त्याने विद्यार्थिनींना बनावट पत्रेही दिली होती. तपासादरम्यान असे समोर आले की, हा आरोपी रुग्णांकडून पैसे उकळण्याचे कामही करत होता.
हे संपूर्ण प्रकरण तेव्हा उघडकीस आले जेव्हा केजीएमयूच्या पॅथॉलॉजी विभागातील डॉ. रमीझ उद्दीन नायक याच्यावर एका महिला सहकाऱ्याने गंभीर आरोप केले. रमीझने लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले आणि तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, रमीझने फेब्रुवारी २०२५ मध्ये तिला जबरदस्तीने पीलीभीत येथे नेले आणि तिथे तिचे धर्मांतर करून लग्न केले.
तपासाअंती पोलिसांनी रमीझचे वडील सलीम उद्दीन आणि आई खादिजा यांनाही अटक केली आहे. धर्मांतराच्या या प्रक्रियेत मदत करणारा एक स्थानिक मौलवी आणि साक्षीदारही पोलिसांच्या रडारवर आहेत. रमीझने यापूर्वी आग्रा येथे एमबीबीएस करत असतानाही एका हिंदू महिलेशी लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या रॅकेटचे जाळे नेमके कुठेपर्यंत पसरले आहे, याचा शोध घेतला जात आहे.