देशभरातील सायबर फसवणुकीत ३२ बॅंक अधिकारी सहभागी; ५२ जणांना अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
देशभरातील सायबर फसवणुकीत ३२ बॅंक अधिकारी सहभागी; ५२ जणांना अटक

हैदराबाद: देशभरात पसरलेल्या मोठ्या सायबर फसवणूक रॅकेटचा (Cyber Fraud Racket) पर्दाफाश करत हैदराबाद पोलिसांनी (Hydrabad Police)  ‘ऑपरेशन ऑक्टोपस 2.0’ अंतर्गत मोठी कारवाई केली.  एकूण ५२ जणांना अटक करण्यात आली आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे ३२ बँक अधिकारीही (Bank Officer)  सहभागी असल्याचे उघड झाले आहे.

ही कारवाई आठवडाभर चाललेल्या बहुराज्यीय मोहिमेत करण्यात आली. तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र (Maharashtra), दिल्ली (Delhi), राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक (karnataka), गुजरात (Gujarat) आणि बिहार या राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकून संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांच्या तपासानुसार, अटक केलेल्या आरोपींमध्ये

३२ बँक कर्मचारी,

१५ म्युल अकाउंट धारक,

आणि ५ मध्यस्थ (दलाल) यांचा समावेश आहे.

हे बँक अधिकारी फक्त निष्काळजी नव्हते, तर त्यांनी सायबर गुन्हेगारांना मदत करून बनावट खाती उघडण्यात सक्रिय सहभाग घेतला, असे तपासात स्पष्ट झाले आहे. ही खाती नंतर चोरीच्या पैशांच्या व्यवहारासाठी वापरली जात होती.

हैदराबादचे पोलीस आयुक्त व्हीसी सज्जनर ( VC Sajjanar) यांनी सांगितले की, ही कारवाई याआधी फेब्रुवारीमध्ये राबवलेल्या ‘ऑपरेशन ऑक्टोपस १’ चा पुढील टप्पा आहे. त्यावेळी देशातील १६ राज्यांमध्ये छापे टाकून ३५० हून अधिक बँक खाती आणि सुमारे ८५० सायबर गुन्हे उघडकीस आले होते.  ज्यात जवळपास १५० कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते.

या वेळी तपासाचा मुख्य भर बँकिंग यंत्रणेतील अंतर्गत सहभागावर होता. तपासात असे आढळले की विविध सार्वजनिक व खासगी बँकांमधील कर्मचारी—रिलेशनशिप मॅनेजर, क्लर्क, केव्हायसी (KYC) मंजुरी अधिकारी आणि प्रोबेशनरी ऑफिसर—यांनी नियमांना बगल देत बनावट खाती उघडण्यास मदत केली.

विशेष म्हणजे, एकाच खासगी बँकेतील सहा कर्मचारी या प्रकरणात सामील असल्याचेही उघड झाले असून काही शाखांमध्ये संगनमताचे संकेत मिळत आहेत.

छापेमारी दरम्यान पोलिसांनी

 २६ मोबाईल फोन,

 १४ चेकबुक,

 २१ शिक्के,

२ पेनड्राइव्ह जप्त केले आहेत.

हे साहित्य फसवणूक नेटवर्क चालवण्यासाठी वापरले जात असल्याचा संशय आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, अलीकडच्या काळात गुंतवणूक फसवणूक, ट्रेडिंग स्कॅम आणि ‘डिजिटल अरेस्ट’ सारख्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यात लोकांना फसवून किंवा धमकावून पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले जाते.

ही कारवाई डीसीपी (सायबर क्राईम) व्ही. अरविंद बाबू आणि एसीपी आर. जी. शिवा मारुती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास सुरू असून; या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा