अमेरिकेने इराणचे जहाज रोखल्यानंतर पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता

इराणचे अमेरिकेच्या जहांजावर ड्रोन हल्ले

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
36 mins ago
अमेरिकेने इराणचे जहाज रोखल्यानंतर पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता

तेहरान : अमेरिकेने इराणचे मालवाहू जहाज रोखल्यानंतर या दोन्ही देशांमध्ये पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणने अमेरिकेच्या जहांजावर ड्रोन हल्ले केले. होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण कधीडी सोडणार नसल्याचा इशारा इराणने दिला आहे. 

त्यानंतर मध्यपूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढला असून; होर्मुझ सामुद्रधुनीवरून इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump ) यांनी सांगितले की, अमेरिकन नौदलाने इराणी ध्वज असलेले ‘तुस्का’ (‘Touska’)  हे मालवाहू जहाज अडवले.  अमेरिकेच्या युद्धनौकेने ओमानच्या आखातात जहाजाला थांबण्याचा इशारा दिला. मात्र इशारा न पाळल्याने जहाजाच्या इंजिनरूमला लक्ष्य करत कारवाई करण्यात आली आणि ते जहाज अमेरिकेच्या ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईनंतर इराणने (Iran) तात्काळ प्रत्युत्तर देत अमेरिकन लष्करी जहाजांवर ड्रोन हल्ले केल्याचे वृत्त आहे. इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या या कृतीला “उघड आक्रमकता” असे संबोधत लवकरच प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे.

चर्चेत सहभागी होण्यास इराणचा नकार 

दरम्यान, दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चेची शक्यता निर्माण झाली होती. अमेरिकेचे प्रतिनिधी चर्चेसाठी पाकिस्तान येथे जाणार असल्याची माहिती समोर आली. मात्र इराणने या चर्चेत सहभागी होण्यास नकार दर्शवला आहे. अमेरिकेच्या “अतिरिक्त मागण्या आणि विसंगत भूमिकेमुळे” चर्चेत सहभागी होणार नसल्याचे इराणने स्पष्ट केले.

होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची हालचाल वाढली असून; एका दिवसात २०हून अधिक जहाजांनी मार्गक्रमण केल्याची नोंद आहे. यामध्ये इराणकडून तेल आणि इतर मालवाहतूक करणाऱ्या जहाजांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक तेलबाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून; इंधनाच्या किमतीत वाढ झाली आहे.

परिस्थिती अधिक तणावपूर्ण

इराणचे उपाध्यक्ष मोहम्मद रझा आरेफ यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले की, “इराणच्या तेल निर्यातीवर निर्बंध घालून इतरांसाठी मुक्त सुरक्षा अपेक्षित ठेवता येणार नाही.” त्यांनी जागतिक बाजारासाठी समान संधी देण्याचे आवाहन केले आहे.

या सर्व घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली असून, आगामी काही दिवसांत या संघर्षाची दिशा काय असेल याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. 

होर्मुझ सामुद्रधुनीवर इराण ठाम

मध्यपूर्वेत इराण आणि अमेरिकेमधील तणाव आणखी तीव्र झाला असून; होर्मुझ सामुद्रधुनीच्या  (Strait of Hormuz) नियंत्रणावरून दोन्ही देश आमनेसामने आले आहेत. इराणने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, “होर्मुझ  सामुद्रधुनीवरील नियंत्रण कधीही सोडणार नाही”, ज्यामुळे जागतिक पातळीवर चिंता वाढली आहे.

या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून इराणने अमेरिकन नौदलाच्या जहाजांवर ड्रोन हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. इराणने अमेरिकेची ही कारवाई “उघड आक्रमण” असल्याचे म्हटले असून; लवकरच कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

इराणने अमेरिकेचा नाकेबंदी हटविल्याशिवाय सामुद्रधुनी पूर्णपणे खुली केली जाणार नाही, असा ठाम इशारा दिला आहे.  एकूणच, होर्मुझ सामुद्रधुनीवरील संघर्षामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती गंभीर बनली आहे. युद्धविराम टिकणार की संघर्ष आणखी वाढणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा