अजमेरमध्ये भीषण अपघात: प्रवाशांनी भरलेली बस २०० फूट खोल दरीत कोसळली

दोन ठार, ३१ जखमींसह पाच जणांची प्रकृती चिंताजनक

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
59 mins ago
अजमेरमध्ये भीषण अपघात: प्रवाशांनी भरलेली बस २०० फूट खोल दरीत कोसळली

अजमेर : अजमेरमधील प्रसिद्ध पुष्कर घाटात रविवारी सकाळी एक दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेली एक बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात एका बालकासह दोन जणांचा मृत्यू झाला असून, ३१ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस अजमेरहून पुष्करच्या दिशेने जात होती. बसमध्ये एकूण ३१ प्रवासी होते, जे एका कौटुंबिक सामाजिक कार्यक्रमासाठी पीसांगन येथे जात होते. पुष्करपासून अवघ्या ३ किमी अंतरावर असलेल्या 'सांझी की छत' या धोकादायक वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस थेट दरीत कोसळली.

अपघात होताच परिसरात एकच खळबळ उडाली. बस दरीत कोसळल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. दरी खोल असल्याने आणि रस्ता निसरडा असल्याने बचावकार्यात अडथळे येत होते. मात्र, स्थानिकांनी स्वतःच्या कपड्यांच्या दोरखंडा तयार करून दरीत उतरून जखमींना बाहेर काढले. नागरिकांच्या या समयसूचकतेमुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले. घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ, सिव्हिल डिफेन्स आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य राबवले.

अजमेरचे जिल्हाधिकारी लोकबंधू यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी सांगितले की, दोन महिलांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. एकूण ८ ॲम्ब्युलन्सच्या साहाय्याने जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. प्रथम त्यांना पुष्करच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर गंभीर जखमींना अजमेरच्या जेएलएन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींना सर्वतोपरी वैद्यकीय उपचार पुरवले जात आहेत.

या अपघातामुळे पुष्कर घाटात दोन्ही बाजूंनी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बस बाहेर काढण्यासाठी क्रेन पाचारण करण्यात आली होती, ज्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली. पोलिसांनी काही तासांच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत केली. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की चालकाच्या निष्काळजीपणामुळे, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. 


हेही वाचा