कुडचडे-सावर्डे रस्त्यावर अपघातप्रवण क्षेत्रात दोन चारचाकी वाहनांची धडक; एकजण गंभीर

दिशादर्शक सूचनाफलकांचा अभाव; रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
38 mins ago
कुडचडे-सावर्डे रस्त्यावर अपघातप्रवण क्षेत्रात दोन चारचाकी वाहनांची धडक; एकजण गंभीर

पणजी : कुडचडे-सावर्डे महामार्गावरील जुवारी पुलाजवळ शनिवारी अल्टो आणि वॅगनआर या दोन कारमध्ये भीषण धडक झाली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा भाग अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅकस्पॉट) आहे. मात्र या ठिकाणी कोणतेही सुचनाफलक लावण्यात आलेले नाही. याठिकाणी वारंवार उद्भवणाऱ्या घटनांमुळे नागरिकांत संताप पसरला आहे. 

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली. जुवारी पुलाजवळील हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून, येथे वारंवार अपघात होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. खराब रस्ते, जागोजागी पडलेले खड्डे आणि कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक व सूचना फलक नसल्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडतो. त्याचा शेवट हमखास भीषण अपघातांमध्ये होतो. मुख्य महामार्ग आणि कामो गावाकडे जाणारा जोड रस्ता या दोन्ही ठिकाणी सुरक्षिततेचा अभाव असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले.

वारंवार होणाऱ्या या अपघातांनंतरही प्रशासन ढिम्म असल्याची टीका स्थानिकांनी केली आहे. संबंधित प्राधिकरणाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, गतीरोधक बसवावेत आणि ठळक सूचना फलक लावावेत, अशी मागणी जोर धरत आहे. भविष्यात प्राणहानी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थापन अधिक कडक करण्याची गरज असल्याचेही रहिवाशांनी स्पष्ट केले आहे. महामार्गावरील या वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.


हेही वाचा