मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिरगावात ‘मॉक ड्रिल’

प्रशासन सज्ज : लईराई जत्रोत्सवासाठी ९०० पोलिसांचा फौजफाटा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th April, 11:55 pm
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिरगावात ‘मॉक ड्रिल’

डिचोली : शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या प्रसिद्ध जत्रोत्सवानिमित्त राज्य प्रशासनाने व्यापक तयारी पूर्ण केली असून, प्रत्येक भाविकाची सुरक्षा ही आमची पूर्ण जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. शनिवारी रात्री जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘मॉक ड्रिल’ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रेमेंद्र शेट तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शनिवारी रात्री आयोजित मॉक ड्रिल आयोजित केले होते. त्यावेळी बैठकीत पोलीस दल, अग्निशामक दल, आरोग्य विभाग, वाहतूक विभाग तसेच विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी, देवस्थान पदाधिकारी उपस्थित होते.
सुमारे ९०० पोलीस कर्मचारी आणि विविध विभागांचे अधिकारी, पोलीस टीम, आरोग्य सेवा, अग्निशामक दल या व्यवस्थेत सहभागी असून, मागील सहा ते आठ महिन्यांपासून तयारी सुरू होती. आता ही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले
मुख्यमंत्र्यांनी कंट्रोल रूमला भेट देऊन सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर यंत्रणांची पाहणी केली. विशेषतः होमकुंड परिसरात रात्रीच्या वेळी कडक सुरक्षा, तसेच काही वेळेसाठी वाहतूक नियंत्रण लागू करण्याचे निर्देश देण्यात आले. गर्दीत ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि स्वत:च्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी भाविकांना केले.

यावेळी आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही विविध सूचना केल्या. बैठकीला जिल्हाधिकारी अंकित यादव, पोलीस अधीक्षक हरीश मडकईकर, उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई, पोलीस उपअधीक्षक श्रीदेवी आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून जत्रोत्सव यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी संपूर्ण नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

जबाबदारी झटकू नका; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षी घडलेल्या दुर्दैवी घटनेचा विचार करता यंदा विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. कोणत्याही अधिकाऱ्याने आपली जबाबदारी झटकू नये, तर सर्व विभागांनी एकत्रितपणे कार्य करून हा जत्रोत्सव निर्विघ्न पार पाडावा. गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवणे, संशयास्पद हालचालींवर तत्काळ कारवाई करणे आणि वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.