
मडगाव : केळशी पंचायतीने (Cavelossim Panchayat) मान्सूनपूर्व कामांना वेग दिलेला असतानाच सामाजिक बांधिलकी बाळगत गरीब कुटुंबांच्या घरांचे छप्पर दुरुस्ती करून दिले. पंचायत केवळ विकासकामांसाठी नाही तर लोकांच्या मदतीसाठीही असल्याचे सरपंच (Sarpanch) डिक्सन वाझ यांनी सांगितले.
केळशी येथील ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपत गरजू व गरीब कुटुंबांना आधार दिला आहे. केळशी पंचायत परिसरातील तिबेट पासोस येथील रहिवासी थॉमस पासान्हा यांच्या घराचे छप्पर मोडकळीस आलेले होते. पावसाळ्यात या घरात राहणे धोकादायक असतानाही थॉमस यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने त्यांना दुरुस्ती करणे शक्य नव्हते. थॉमस हे टॅक्सी (Taxi) व्यवसाय करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
पण सध्या त्यांची मानसिक स्थिती चांगली नसल्याने कुटुंबाचा आधारच हरपलेला आहे. या पावसाळ्यात कुटुंबावर छपर कोसळून अनुचित घटना घडू शकते, याची माहिती केळशी पंचायतीला मिळाली. सरपंच डिक्सन वाझ व पंच सुझल बार्रेटो यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पुढाकार घेतला व पंचायतीच्या खर्चातून घराचे छप्पर खाली काढून छपराची दुरुस्ती करून दिली.
सरपंच डिक्सन वाझ यांनी सांगितले की, केळशी गावातील दुर्बल घटकांतील लोकांसाठी पंचायतीने काम करावयास सुरूवात केली आहे. केवळ रस्त्याची दुरुस्ती, धोकादायक झाडांची तोड व नाले सफाई एवढीच पंचायतीचे काम नाही तर त्यापुढे जात गरजू लोकांना आवश्यक असा आधार देण्यासाठी पंचायत काम करत आहे.
पंचायतीने आतापर्यंत गावातील अनेक घरांची दुरुस्ती केली असून; ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे सरपंचांनी सांगितले. घराच्या छपराच्या दुरुस्तीनंतर थॉमस यांच्या कुटुंबीयांनी सरपंच, पंच व पंचायत सदस्यांचे आभार मानले.