पणजीत १९ ते २६ दरम्यान परशुराम महोत्सवाचे आयोजन

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
57 mins ago
पणजीत १९ ते २६ दरम्यान परशुराम महोत्सवाचे आयोजन

पणजी :  राष्ट्रीय परशुराम परिषद गोवा विभाग आणि माहिती आणि प्रसारण खात्यातर्फे (Department of Information and Broadcasting) पणजी येथे गोमंत जनक भगवान परशुराम अवतरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सव १९ ते २६ एप्रिल दरम्यान गोवा मनोरंजन संस्थेसमोरील (Entertainment Society of Goa)  परशुराम पुतळ्याच्या परिसरात होणार असल्याची माहिती परिषदेचे प्रेमपाल सिंग यांनी दिली.

शनिवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गजेंद्र सिंग राजपूत, प्रेम पाल सिंग, डॉ. अमित नागर, महेश कांदोळकर उपस्थित होते. सिंग यांनी सांगितले की, हा महोत्सव गोमंतक जनक भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जात आहे. मागील अनेक वर्षे आमची परिषद देशभरात कार्यरत आहे. गोव्याची निर्मिती भगवान परशुराम यांनी केली होती.

त्यामुळे आम्ही येथेही महोत्सवाचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. त्यापूर्वी आम्ही परशुरामाशी संबंधित गोव्यातील विविध ठिकाणांना भेट दिली. महोत्सवात १९ रोजी परशुराम पुतळ्यापासून कलश यात्रा काढण्यात येईल. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर महाआरतीद्वारे महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होईल. 

सिंह म्हणाले की, हा महोत्सव केवळ भगवान परशुरामांच्या जयंतीचा उत्सव नाही, तर आपल्या आध्यात्मिक वारशाचा आणि सांस्कृतिक परंपरांचा सन्मान आहे. महोत्सवात देशभरातून भाविक, संत, मान्यवर आणि सांस्कृतिक प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

हा कार्यक्रम भक्ती, एकता आणि सांस्कृतिक सातत्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवेल. गोमंतकीय जनतेने आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. या महोत्सवाचा उद्देश गोव्याला धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटनासाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करणे हा आहे.

महोत्सवात २० ते २४ एप्रिल दरम्यान परमपूज्य दिलीप कृष्ण भारद्वाज महाराज यांच्या हस्ते भगवान परशुराम कथा वाचन होईल. यामध्ये त्यांच्या जीवनातील आणि धर्मातील शिकवण सांगितली जाईल. याशिवाय दररोज संध्याकाळी काशीहून आलेल्या पुजाऱ्यांकडून महाआरती केली जाईल. याशिवाय भगवान परशुराम यांच्या मूर्तीवर दररोज प्रकाश व ध्वनी आधारित कार्यक्रम सादर केला जाईल. यातून त्यांच्या कार्याचा आणि शिकवणीचा परिचय दिला जाईल. संपूर्ण आठवडाभर पूजा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भक्तीमय कार्यक्रम आयोजित केले जातील. हा महोत्सव २६ एप्रिल रोजी संपन्न होईल.

हेही वाचा