‘३२व्या अवेन्यू ग्रुप’ फसवणूक प्रकरणाचा तपास

पणजी/नवी दिल्ली: सुमारे ५०० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक घोटाळ्याच्या तपासात गोव्याचा महत्त्वाचा धागा समोर आला असून, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गोव्यातील आलिशान यॉटसह (yacht) काही स्थावर मालमत्तांची ओळख पटवली आहे. या मालमत्ता गुंतवणूकदारांच्या पैशांच्या गैरवापरातून खरेदी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
एकाच जागेची वारंवार विक्री करून फसवणूक
ईडीने (Enforcement Directorate) १३ आणि १४ एप्रिल रोजी दिल्ली-एनसीआर, गोवा (Goa), जयपूर आणि मुंबईतील सात ठिकाणी एकत्रित छापे टाकले. या कारवाईदरम्यान, रिअल इस्टेटशी संबंधित संघटित ‘पॉन्झी’ स्वरूपाच्या फसवणुकीचे पुरावे हाती लागल्याचे सांगण्यात आले. या योजनेत एकाच ‘व्हर्च्युअल’ व्यावसायिक जागेची वारंवार विक्री करून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गोव्यातील यॉटसह गुरुग्राम आणि महाराष्ट्रातील काही मालमत्ता गुन्ह्यातून मिळालेल्या पैशातून खरेदी केल्याचा संशय आहे. गुंतवणूकदारांच्या निधीतून आलिशान जीवनशैली उभारल्याचा आरोपही तपासात पुढे आला आहे.
हा तपास ‘३२वा अवेन्यू ग्रुप’ (32nd Avenue Group) आणि त्याचे प्रवर्तक संचालक अनुभव शर्मा व ध्रुव शर्मा यांच्याभोवती केंद्रीत आहे. दिल्ली पोलीस (Delhi Police) व गुरुग्राम पोलिसांनी (Gurugram Police) त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हे (FIR) नोंदवले आहेत.
अशी केली फसवणूक : ईडी
ईडीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी गुंतवणूकदारांना हमी भाडे परतावा व दीर्घकालीन मूल्यवाढीचे आश्वासन देत व्यावसायिक जागा खरेदीस प्रवृत्त केले. सुरूवातीला काही महिन्यांसाठी आकर्षक भाडे परतावा देऊन विश्वास निर्माण केला जात असे. त्यानंतर त्याच जागांची पुन्हा नव्या गुंतवणूकदारांना विक्री करून ‘पॉन्झी’ पद्धतीने फसवणूक चालवली जात होती.
गुंतवणूकदारांचे ५०० कोटी वळवले
तपासात ५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम गुंतवणूकदारांकडून वळवण्यात आल्याचे उघड झाले आहे. ही रक्कम विविध शेल व बेनामी कंपन्यांमार्फत फिरवून मूळ स्त्रोत लपवण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे.
कोट्यवधींची रोख रक्कम, सोने, दागिने जप्त
छाप्यांदरम्यान १.०५ कोटी रुपये रोख, तसेच सुमारे १.५ कोटी रुपयांचे सोने व दागिने जप्त करण्यात आले. याशिवाय काही बँक खाती व लॉकर गोठवण्यात आले असून, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि इतर पुरावेही जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, ध्रुव शर्मा आणि शिरीन शर्मा यांना हरियाणा पोलिसांनी अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवले आहे, तर अनुभव शर्मा आणि ममता शर्मा फरार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.