भाविकांची गर्दी आणि सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाने आखला विशेष सुरक्षा आराखडा

पणजी : शिरगावच्या श्री देवी लईराई जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाने आपली तयारी पूर्ण केली असून सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आज (शनिवारी) रात्री विशेष 'मॉक ड्रिल'चे आयोजन करण्यात आले आहे. जत्रोत्सवादरम्यान होणारी अलोट गर्दी लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसून येत आहे.
आज शनिवारी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी आणि मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह शिरगाव येथील मंदिर परिसराची सविस्तर पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात जत्रोत्सवासाठी करण्यात आलेले बॅरिकेडिंग, पार्किंग व्यवस्था, सीसीटीव्ही देखरेख आणि भाविकांच्या सोयी-सुविधांची बारकाईने तपासणी करण्यात आली.
भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. आज रात्री होणाऱ्या मॉक ड्रिलमध्ये पोलीस दल, अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाच्या समन्वयाची चाचणी घेतली जाईल, जेणेकरून मुख्य उत्सवावेळी कोणतीही त्रुटी राहू नये.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यावेळी मंदिर समितीशी संवाद साधून नियोजनाचा आढावा घेतला. भाविकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून जत्रोत्सव शांततेत साजरा करावा, असे आवाहन यावेळी आमदार प्रेमेंद्र शेट आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.