दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिकांनी पोलिसांना कळवले; दरवाजा तोडताच समोर आला धक्कादायक प्रकार.

पणजी : दक्षिण गोव्यातील केपे (Quepem) येथे एका बंद घरामध्ये माय-लेकीचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. ही घटना शनिवारी उघडकीस आली. अल्का दत्ताराम शिरवईकर (७७) आणि अनार दत्ताराम शिरवईकर (४२) असे या दोघींचे नाव आहे. घरात त्या दोघीच राहत होत्या. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले, त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.
मिळालेल्या माहितीनुसार, केपे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घराचा दरवाजा तोडला असता त्यांना मायलेकीचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आले. आईचा मृतदेह बेडवर तर, मुलीचा मृतदेह फासाला लटकलेल्या स्थितीत होता. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान उत्तर गोव्यात कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या मुलाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. प्राथमिक तपासाअंती पोलिसांनी या घटनेची नोंद 'अनैसर्गिक मृत्यू' म्हणून केली आहे.
आईच्या नैसर्गिक मृत्यूनंतर नैराश्यातून मुलीने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणाचा तपास केपे पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली महिला उपनिरीक्षक दीपा दयेकर करत आहेत.