इराणने होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा केली बंद

जागतिक तेल व्यापारावर परिणामाची शक्यता

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
इराणने होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा केली बंद

तेहरान/वॉशिंग्टन: जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. इराणने शनिवारी या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या नाकाबंदीच्या पार्श्वभूमीवर हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे.

इराणच्या (Iran)  संयुक्त लष्करी मुख्यालयाने स्पष्ट केले की, “ होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण पूर्वस्थितीत परत आले असून, आता या महत्त्वाच्या मार्गावर सशस्त्र दलांचे कडक नियंत्रण राहील.” याआधी चर्चेच्या पार्श्वभूमीवर मर्यादित प्रमाणात तेलवाहू टँकर आणि व्यापारी जहाजांना मार्ग देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अमेरिकेकडून (USA) करारांचे वारंवार उल्लंघन होत असल्याचा आरोप करत इराणने आपली भूमिका बदलली आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी स्पष्ट केले की, “इराणसोबत अणुकार्यक्रमासह व्यापक करार होईपर्यंत अमेरिकेची नाकाबंदी कायम राहील.” या विधानानंतर अवघ्या काही तासांत इराणने सामुद्रधुनीवरील नियंत्रण पुन्हा कडक केले.

इराणच्या लष्करी प्रवक्त्याने अमेरिकेवर “समुद्री दरोडा” आणि “नाकाबंदीच्या नावाखाली गैरवर्तन” केल्याचा आरोप केला. तसेच, “जोपर्यंत अमेरिकेकडून इराणच्या जहाजांना मुक्त मार्ग देण्याची हमी मिळत नाही, तोपर्यंत होर्मुझ सामुद्रधुनीत कडक नियंत्रण कायम राहील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

जगातील सुमारे २० ते २५ टक्के तेल वाहतूक या अरुंद समुद्री मार्गातून होते. त्यामुळे या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमती वाढण्याची आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा