नाशिकचा भोंदू अशोक खरात‌विरुद्ध तक्रारींचा पाऊस!; १५ गुन्हे नोंद

४० जणांच्या जबान्या नोंदवल्या

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
नाशिकचा भोंदू अशोक खरात‌विरुद्ध तक्रारींचा पाऊस!; १५ गुन्हे नोंद

नाशिक : येथे उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) खळबळ उडवली आहे. या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तक्रारींसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईनवर (Helpline) तक्रारींचा पाऊस पडत आहे.  आता पर्यंत १५ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत तर ४० जणांच्या जबान्या घेण्यात आल्या आहेत. 

तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमण्यात आले असले तरी; प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः या तपासावर बारकाईने लक्ष ठेवत आहेत.

महिलांचा पुढाकार, हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ

प्रारंभी बदनामीच्या भीतीमुळे अनेक महिला तक्रार करण्यास पुढे येत नव्हत्या. मात्र, पोलिसांनी गोपनीयतेची हमी दिल्यानंतर आता महिलांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला आहे. यासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष हेल्पलाईनवर दररोज ५ ते ६ कॉल येत आहेत.  गेल्या २३ दिवसांत शेकडो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रारदारांमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय असून, फसवणूक, विश्वासघात आणि दबाव टाकल्याचे प्रकार समोर आले आहेत.

१५ गुन्हे दाखल, ४० जणांचे जबाब नोंद

अशोक खरातविरुद्ध आतापर्यंत विविध कलमांखाली १५ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी ८ गुन्हे महिलांवरील अत्याचाराशी संबंधित आहेत. हेल्पलाईनवर आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी (Nashik Police)  आतापर्यंत ४० जणांचे साक्षीदार म्हणून जबाब नोंदवले आहेत. त्यामुळे खरातवरील कायदेशीर कारवाई अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.

अंनिसची राज्यभर जनजागृती मोहीम

या प्रकरणानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आक्रमक झाली असून, श्याम मानव यांच्या नेतृत्वाखाली अकोला येथे ‘बुवाबाजी संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्यभर जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला आहे.

आज पुन्हा न्यायालयात नेणार 

महिला अत्याचार प्रकरणातील चौथ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपत असल्याने; अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि एसआयटीने (SIT)  संयुक्त कारवाई करत त्याच्या कार्यालयावर छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. आजच्या सुनावणीत सरकारी पक्ष कोणते नवे पुरावे सादर करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा