घरचे दार‌िद्र्य, लग्न, अमानुष छळ, नंतर आयएएस अधिकारी; महिलेची यशोगाथा

मध्यप्रदेशातील सविताची संघर्षमय कहाणी हजारो महिलांसाठी प्रेरणादायी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
17th April, 12:51 pm
घरचे दार‌िद्र्य, लग्न, अमानुष छळ, नंतर आयएएस अधिकारी; महिलेची यशोगाथा

भोपाळ : ‘इच्छा तेथे मार्ग’ याचे बोलके उदाहरण म्हणजे नुकत्याच पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी (UPSC)  परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी बनलेल्या सविता प्रधान. घरचे दारिद्र्य, गरीबी, १६ वर्षांची असताना झालेले लग्न, नंतर अमानुष छळ व घटस्फोट एवढे सर्व सोसूनही दोन मुलांची आई असलेल्या महिलेने आपले आयएएस (IAS)  अधिकारी बनण्याचे ध्येय पूर्ण केले. मध्यप्रदेशातील सिंगरौली नगरपालिका आयुक्त म्हणून त्या सध्या कार्यरत आहेत.  त्यांची ही संघर्षमय कहाणी आज देशभरातील हजारो महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. 

मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) नर्मदापुरम येथील मडई गावात एका गरीब आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या सविता प्रधान (Savita Pradhan) यांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. दहावी (SSC) उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात प्रवेश घेतला. मात्र, आर्थिक अडचणी इतक्या तीव्र होत्या की बसचे दोन रुपयांचे भाडेही परवडत नव्हते. त्यामुळे त्या रोज पायी चालत जात असत. 

१६व्या वर्षी लग्न

शिकण्याची इच्छा असतानाही अवघ्या १६व्या वर्षी सविता यांचे लग्न करण्यात आले. शिक्षण सुरू ठेवण्यात येणार असे आश्वासन देण्यात आले असले तरी लग्नानंतर त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले. पती आणि सासरच्या मंडळींकडून त्यांना वारंवार मारहाण, अपमान आणि अमानुष वागणूक सहन करावी लागली. त्यांच्या दोन लहान मुलांसमोर त्यांच्यावर अत्याचार करण्यात येत होते. पती बादलीत लघवी करून अंगावर फेकत होता. इतकेच नव्हे, तर त्यांना उपाशी ठेवले जात होते.  आणि दिवसभर काम करण्यास भाग पाडले जात होते. बाथरूममध्ये जाऊन त्यांना चपात्या खाव्या लागायच्या. 

नव्याने आयुष्य उभारणी 

या कष्टमय, हालअपेष्टांच्या परिस्थितीमुळे त्या एका टप्प्यावर आत्महत्येचा विचारही करू लागल्या होत्या. मात्र, त्यांनी हार न मानता अत्याचार सहन करण्याऐवजी संसार सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि नव्याने आयुष्य उभारण्यास सुरूवात केली. आपल्या अथर्व आणि याजुस या दोन मुलांना घेऊन आपल्या नातेवाईकांकडे जाऊन राहिल्या. 

उदरनिर्वाहासाठी शिकवणी वर्ग, सलूनमध्ये काम

उदरनिर्वाहासाठी त्यांनी सलूनमध्ये काम केले तसेच शिकवणी वर्गही घेतले. या सर्व जबाबदाऱ्यांमध्येही त्यांनी शिक्षण सुरू ठेवले आणि यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेची तयारी केली. अखेर त्यांच्या अथक परिश्रमांना यश मिळाले आणि त्यांनी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण करत आयएएस अधिकारी बनल्या. 

सविता प्रधान यांची ही यशोगाथा केवळ एका व्यक्तीची कामगिरी नसून; ती जिद्द, चिकाटी आणि स्वप्नांवर अढळ विश्वास याचे जिवंत उदाहरण आहे. कठीण परिस्थितीतही न डगमगता पुढे जाण्याची प्रेरणा देणारी त्यांची कहाणी आज अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहे.

हेही वाचा