
पणजी : मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश भरत पी. देशपांडे यांची गोवा मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या नियुक्तीचा आदेश राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी जारी केला आहे.
आयोगाला गेल्या काही दिवसांपासून पूर्णवेळ अध्यक्ष नसल्यामुळे, माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश डेस्मंड डिकोस्ता हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून तक्रारी आणि याचिकांवर सुनावणी घेत होते. आता पूर्णवेळ अध्यक्षांची नियुक्ती झाल्यामुळे भारत पी. देशपांडे हे आयोगाच्या कामकाजाची सूत्रे हाती घेतील.
निवृत्त न्यायाधीश पी. के. मिश्रा हे या आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर निवृत्त न्यायाधीश यू. व्ही. बाक्रे यांनी हे पद भूषवले. बाक्रे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर डेस्मंड डिकोस्ता यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाचा ताबा होता. आता बी. पी. देशपांडे यांच्या नियुक्तीने आयोगाला पुन्हा पूर्णवेळ अध्यक्ष मिळाला आहे.